महावीर जयंती च्या पूर्वसंध्येला उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी जनतेला दिल्या शुभेच्छा
दरम्यान उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांनी महावीर जयंतीच्या पूर्वसंध्येला देशातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
चैत्र महिन्यातील शुल्क पक्षातील त्रयोदशी ला जैन (Jain) समाजातील 24 तीर्थंकारांपैकी शेवटचे तीर्थंकर भगवान महावीर यांचा जन्म झाला. त्यामुळे हा दिवस जैन धर्मीय (Jain religion) 'महावीर जयंती' (Mahavir Jayanti) म्हणून साजरा करतात. उद्या म्हणजेच 25 एप्रिल रोजी संपूर्ण देशभरात महावीर जयंती साजरी केली जाणार आहे. मात्र कोरोना विषाणूमुळे यावर्षी सर्व धर्मीय सण, उत्सव तसेच सर्व कार्यक्रम अतिशय साधेपणाने साजरे करण्यात येत आहेत. दरम्यान उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू (M. Venkaiah Naidu) यांनी महावीर जयंतीच्या पूर्वसंध्येला देशातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
"महावीर जयंतीच्या मंगल प्रसंगी मी आपल्या देशवासियांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो आणि त्यांचे अभीष्टचिंतन करतो. भगवान महावीरांनी त्यांच्या अहिंसा, दयाभाव आणि निस्वार्थ भावाच्या शिकवणीतून मानवजातीचा एकोपा आणि प्रगती यासाठी प्रकाशमान मार्गाची दिशा दाखवली. ते खरोखरीच आपल्या देशातील सामाजिक सुधारणा आणि शांतीच्या महान प्रेषितांपैकी एक आहेत." असे त्यांनी म्हटले आहे.हेदेखील वाचा- Mahavir Jayanti 2021: कोरोनाच्या पार्श्वभुमीवर महावीर जयंती साधेपणाने साजरी करण्याचे आवाहन; गृहविभागामार्फत मार्गदर्शक सूचना जारी
जैन समुदायामध्ये या उत्सवाला विशेष महत्त्व आहे आणि संपूर्ण भारतभर तसेच जगात हा सण अध्यात्मिक चैतन्याने आणि उत्सवी उर्जेने साजरा केला जातो. भक्तांनी केलेले दानधर्म, स्तवनांचे पठण, रथातून भगवानांची मिरवणूक तसेच जैन मुनी आणि साध्वी यांची प्रवचने ही या उत्सवाची विशेष आकर्षणे आहेत. मात्र सध्याच्या कोविड-19 महामारीच्या परिस्थितीत, मी माझ्या सहकारी नागरिकांना हा सण आपापल्या घरी राहून आणि कोविड अनुरूप आरोग्य आणि स्वच्छता विषयक नियमावलीचे संपूर्ण पालन करून साजरा करण्याची विनंती करतो.
भगवान महावीरांच्या शिकवणीच्या चैतन्यमयी प्रकाशात, आपण सर्वजण आपापल्या पद्धतीने कोविड -19 विरुद्धच्या सामायिक लढ्यात सहभागी होऊया. भगवान महावीरांची शिकवण आत्मसात करण्यासाठी आपल्या बांधिलकीचा पुनरुच्चार करूया आणि शांतताप्रिय, सुसंवादी आणि न्यायी समाजाची उभारणी करण्यासाठी स्वतःला समर्पित करूया. उपराष्ट्रपतींचा हा संदेश सर्व जनतेला प्रेरणा देणारा आहे.