Sachin Vaze Arrested: मुकेश अंबानींच्या घराबाहेरील स्कॉर्पिओमध्ये स्फोटके ठेवल्याच्या प्रकरणात पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना अटक
एनआयएकडून मिळालेल्या माहितीनुसार, एन्काऊंटर तज्ञ सचिन वाझे यांना 12 तासाच्या दिर्घ चौकशीनंतर अटक करण्यात आली.
Sachin Vaze Arrested: राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (National Investigation Agency) महाराष्ट्र पोलिस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) यांना अँटिलीया प्रकरणात अटक केली आहे. एनआयएच्या अधिकाऱ्यांनी सचिन वाझे यांना 13 मार्च रोजी म्हणजेच शनिवारी रात्री 11.50 वाजता अटक केली. यापूर्वी ठाणे कोर्टाने सचिन वाझे यांना अंतरिम जामीन देण्यास नकार दिला होता. एनआयएकडून मिळालेल्या माहितीनुसार, एन्काऊंटर तज्ञ सचिन वाझे यांना 12 तासाच्या दिर्घ चौकशीनंतर अटक करण्यात आली. राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) वतीने बनावट काम, स्फोटक पदार्थांकडे दुर्लक्ष करणे, बनावट शिक्का बनविणे आणि गुन्हेगारी धमकी यासाठी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबईतील उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरापासून काही अंतरावर स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ वाहनाच्या प्रकरणात एनआयए चौकशी करत आहे. ही घटना 25 फेब्रुवारी 2021 रोजी दक्षिण मुंबईत घडली. याच ठिकाणी मुकेश अंबानी यांचे निवासस्थान अँटिलिया आहे. (वाचा - Ambani House Bomb Scare: API सचिन वाझे यांना ठाणे सेशन कोर्टाने अंतरिम जामीन फेटाळला)
एनकाउंटर तज्ञ सचिन वाजे यांना रविवारी न्यायालयात हजर केले जाऊ शकते. सचिन वाझे यांच्याविरूद्ध आरसी क्रमांक 01/2021/NIA/MUM अंतर्गत भादंवि कलम 286, 465, 473, 506(2), 120 B आणि Explosive Substances Act 1908 च्या कलम 4(a)(b)(I) अंतर्गत अटक केली गेली आहे.
दरम्यान, 25 फेब्रुवारीला उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरापासून काही अंतरावर एक स्कॉर्पिओ कार सापडली होती. या कारमध्ये जिलेटिनच्या काठ्या ठेवल्या गेल्या होत्या. या प्रकरणी सचिन वाझे हे सुरुवातीला तपास करत होते. नंतर, त्यांना या प्रकरणाच्या चौकशीतून काढून टाकण्यात आले आणि या प्रकरणाची चौकशी एनआयएने त्यांच्या हातात घेतली.
ठाण्याचे उद्योजक मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी सचिन वाझे यांच्याविरूद्धही चौकशी सुरू आहे. मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओ कारचे मालक मनसुख हिरेन होते. मनसुख हिरेन 5 मार्च रोजी मृत अवस्थेत आढळले होते.