Wrestlers Protest At Jantar Mantar: जंतर मंतर वर आंदोलक कुस्तीपटू, पोलिसांचा राडा; खेळाडूंचे जीवघेण्या हल्याचे आरोप (Watch Video)

मारहाणीचे आरोप त्यांच्याकडून फेटाळण्यात आले आहेत.

Jantar Mantar | Twitter

दिल्ली (Delhi) मध्ये जंतर मंतर (Jantar Mantar) वर पेहलवानांच्या आंदोलनामध्ये 3-4 मे च्या मध्यरात्री ड्रामा पहायला मिळाला. खेळाडूंच्या दाव्यानुसार त्यांना मारहाण झाली असून जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामध्ये एक पेहलवान जखमी देखील झाला आहे. या घटनेनंतर दिल्ली महिला आयोगाच्या प्रमुख स्वाती मालीवाल, मंत्री सौरभ भारद्वाज, आमदार कुलदीप यांच्यासह अनेकजण जंतर मंतर वर पोहचले. पोलिसांनी त्यांनाही ताब्यात घेतले आहे.

जंतर मंतर वर राड्याच्या सुरूवात ही फोल्डिंग बेड वरून झाली आहे. सोमनाथ भारती ने फोल्डिंग बेड आणला होता. पोलिसांनी त्याला बेड आणण्यापासून रोखलं. पोलिसांनी रोखल्यानंतर ट्रकच्या मदतीने बेड लावण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि त्यामध्ये हा वाद वाढत गेला. दिल्लीत पाऊस झाल्याने झोपायला जागा नव्हती. त्यामुळे आपण फोल्डिंग बेड आणले पण पोलिसांनी त्यांना रोखलं आणि आंदोलक - पोलिसांमध्ये बाचाबाची झाली.

पहा व्हिडिओ

महिला कुस्तीपटू विनेश फोगटचे काही व्हिडिओ समोर आले आहेत. विनेशने दिल्ली पोलिस आयुक्तांना पत्र लिहून तक्रार केली आहे. आंदोलक कुस्तीपटूंवर पोलिसांनी हल्ला केल्याचा गंभीर दावा तिने केला आहे. वरिष्ठ एसपी धर्मेंद्र यांनी खेळाडूंनी जंतर मंतर सोडावं म्हणून धमकावल्याचाही दावा केला आहे. अशा गैर वर्तन करणार्‍या पोलिसांवर कारवाईची मागणी तिने पोलिस आयुक्तांकडे केली आहे. कुस्तीपटूंवर हल्ला करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करावी, वॉटरप्रूफ तंबू लावून द्या अशा मागणीचं पत्र कुस्तीपटू बजरंग पुनिया यांनी गृहामंत्र्यांकडे केले आहे.

पोलिसांनी मात्र आपण फोल्डिंग बेड्सला केवळ विरोध केला आहे. मारहाणीचे आरोप त्यांच्याकडून फेटाळण्यात आले आहेत.