IPL Auction 2025 Live

Winter Session Of Parliament 2022: संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात; महाराष्ट्र सीमावाद गाजण्याची शक्यता

7 डिसेंबर ते 29 डिसेंबर दरम्यान हे अधिवेशन सुरू राहणार असून यामध्ये महाराष्ट्राचं लक्ष सध्या गाजत असलेल्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादावर लागलं आहे.

Parliament building (Photo Credits: Twitter)

संसदेचं हिवाळी अधिवेशन (Winter Session) आजपासून सुरू होणार आहे. 7 डिसेंबर ते 29 डिसेंबर दरम्यान हे अधिवेशन सुरू राहणार असून यामध्ये महाराष्ट्राचं लक्ष सध्या गाजत असलेल्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादावर लागलं आहे. या अधिवेशनामध्ये या मुद्द्याकडे महाराष्ट्राचे खासदार आक्रमक होणार का? हे पहावं लागणार आहे. दरम्यान शिंदे गटाचे खासदार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेण्याचीही शक्यता आहे.  काल बेळगाव मध्ये महाराष्ट्र पासिंग ट्रकचं नुकसान करण्यात आलं. दगडफेकीच्या घटना देखील समोर आल्या. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून या घटनेचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला आहे. आज संसदेच्या पहिल्या दिवशी मागील काही महिन्यात निधन झालेल्या खासदारांना श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे.

23 दिवसांच्या या हिवाळी अधिवेशनामध्ये 17 बैठकांचे नियोजन करण्यात आले आहे. तर 16 विधेयकं सादर केली जाण्याची शक्यता आहे. Trade Marks (Amendment) Bill, 2022, the Geographical Indications of Goods (Registration and Protection) (Amendment) Bill, 2022 and The Repealing and Amending Bill, 2022 ही विधेयकं सादर केली जाणार आहेत. संसदेच्या मागील अधिवेशनामध्ये लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी हिवाळी अधिवेशन नव्या इमारतीमध्ये होईल, असा दावा केला होता. मात्र, अद्याप नव्या इमारतीचे बांधकाम पूर्ण न झाल्याने हे हिवाळी अधिवेशन जुन्याच इमारतीमध्ये होणार आहे.

विरोधी पक्षाकडून कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी, जयराम रमेश, खासदार दिग्विजय सिंह हे अनुपस्थित राहणार आहे. सध्या हे प्रमुख कॉंग्रेस नेते भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होणार आहेत. तर आज पहिल्या दिवशी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी संसद परिसरातून मीडीयाशी संवाद साधतील.