Uttarkashi: उत्तरकाशीतील सहस्त्रताल ट्रेकिंगवर खराब हवामानामुळे 4 ट्रेकर्सचा मृत्यू; अजूनही बचावकार्य सुरू

ही टीम गढवाल पर्वतारोहण आणि ट्रॅकिंग एजन्सीच्या माध्यमातून ट्रेकिंग करत होती. सहस्त्र ताल हे उत्तरकाशी-टिहरी जिल्ह्यांच्या सीमेवर सुमारे 14,500 फूट उंचीवर वसलेले आहे आणि ट्रेकर्सचे आवडते ठिकाण मानले जाते.

Sahastratal (संग्रहित-संपादित प्रतिमा)

उत्तराखंडच्या उंच पर्वतांवरून एक वाईट बातमी समोर आली आहे. उत्तरकाशी (Uttarkashi) जिल्ह्यात 14 हजार फूट उंचीवर ट्रेकिंगसाठी गेलेला ट्रेकर्सचा ग्रुप खराब हवामानामुळे तिथेच अडकला होता. आता माहिती मिळत आहे की, यातील 4 जणांचा मृत्यू झाला आहे. 3 जून रोजी सहस्त्रतालसाठी (Sahastratal) निघालेल्या 20 ट्रेकर्सच्या या गटातील चार ट्रेकर्सचा हायपोथर्मियामुळे मृत्यू झाल्याची माहिती आहे. खराब हवामान असतानाही सात ट्रेकर्स आणि 3 लोकल गाईड कसेबसे बेस कॅम्पवर पोहोचले होते, मात्र त्यांचीही प्रकृती अत्यंत बिकट असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

अजूनही काही ट्रेकर्स वर अडकले आहेत, त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. डेहराडूनहून राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) टीम बचावकार्यासाठी हेलिकॉप्टरने पाठवण्यात आली आहे.

आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील 1 आणि कर्नाटकातील 18 ट्रेकर्सचा ग्रुप सहस्त्र तालुक्यापर्यंत ट्रेक करण्यासाठी उत्तरकाशीला आला होता. ही टीम गढवाल पर्वतारोहण आणि ट्रॅकिंग एजन्सीच्या माध्यमातून ट्रेकिंग करत होती. सहस्त्र ताल हे उत्तरकाशी-टिहरी जिल्ह्यांच्या सीमेवर सुमारे 14,500 फूट उंचीवर वसलेले आहे आणि ट्रेकर्सचे आवडते ठिकाण मानले जाते. या 19 ट्रेकर्ससोबतच 3 स्थानिक मार्गदर्शकांचाही या ग्रुपमध्ये समावेश होता.

हा गट 2 जून रोजी कोखळी टॉप बेस कॅम्पवर पोहोचला आणि 3 जून रोजी सहस्त्रतालला रवाना झाला. 3 जून रोजी शिखरावर पोहोचल्यानंतर अचानक हवामान खराब झाले. दाट धुके आणि बर्फवृष्टीमुळे ट्रेकर्सना तिथेच थांबावे लागले. संपूर्ण रात्र थंडीत घालवल्यामुळे ग्रुपमधील 13 ट्रेकर्सची प्रकृती खालावली, त्यापैकी 4 ट्रेकर्सचा हायपोथर्मियामुळे मृत्यू झाला. उर्वरित 9 ट्रेकर्सना तेथे तंबू उभारून स्लीपिंग बॅगमध्ये झोपण्याची व्यवस्था करण्यात आली.

पहा पोस्ट- 

खराब हवामान असूनही, ट्रेकर्स ग्रुपचे काही सदस्य आणि 3 स्थानिक मार्गदर्शक वर अडकलेल्या लोकांना मदत आणण्यासाठी बेस कॅम्पवर परतले. बेस कॅम्पवर पोहोचल्यानंतर त्यांची प्रकृतीही बिघडली. वर अडकलेल्या ट्रेकर्ससाठी अन्नपाणी घेऊन 4 जून रोजी सकाळी बेस कॅम्पवरून एक गाईड गेला होता, मात्र त्यानंतर त्याचा सर्वांशी संपर्क तुटला. यामुळे कोणाच्याही आरोग्याबाबत माहिती उपलब्ध होत नव्हती.

यानंतर माहिती मिळताच प्रशासनाने डेहराडूनच्या सहस्त्रधारा हेलिपॅडवरून हेलिकॉप्टरमधून बचाव पथकाला उत्तरकाशीला पाठवले. उत्तरकाशीचे जिल्हा दंडाधिकारी (डीएम) डॉ मेहरबान सिंग बिश्त यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 13 जणांना बाहेर काढण्यात आले आहे, तर चार जणांचा मृत्यू झाला आहे. अजूनही शोध आणि बचाव कार्य सुरू आहे.