योगी आदित्यनाथ यांचे वडील आनंद सिंह बिष्ट यांचे निधन; दिल्लीतील AIIMS रुग्णालयात घेतला शेवटचा श्वास

आनंद सिंह हे 89 वर्षाचे होते.

सीएम योगी आदित्यनाथ (Photo Credit-PTI)

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे वडील आनंद सिंह बिष्ट यांचे आज सकाळी 10 वाजून 44 मिनिटांनी दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाले आहे. आनंद सिंह हे 89 वर्षाचे होते. याबाबत उत्तर प्रदेश राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव अविनाश अवस्थी यांनी माहिती दिली आहे. प्राप्त माहितीनुसार, बिष्ट यांना किडनी आणि लिव्हरच्या आजारांनी ग्रासले होते. मागील महिन्यात म्हणजेच 13 मार्च रोजी त्यांना तब्येत आणखीन खालावल्याने एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काही दिवसांपासून त्यांची प्रकृती आणखीन नाजूक होत होती, त्यांना व्हेंटिलेटर वर ठेवण्यात आले होते. अखेरीस आज सकाळी त्यांचे देहावसान झाले.

योगी आदित्यनाथ यांचे वडील आनंद सिंह हे उत्तराखंड मधील यमकेश्वर च्या पंचूर गावात राहत होते. उत्तराखंड च्या फॉरेस्ट रेंजर पदावर नोकरी करून 1991 मध्ये ते निवृत्त झाले होते. योगी आदित्यनाथ हे मात्र लहानपणापासून परिवाराला सोडून गोरखपूरचे महंत अवैद्यनाथ यांच्याकडे रहात होते. उत्तराखंड च्या निवडणुकीच्या काळात आदित्यनाथ हे वडिलांची आणि कुटुंबाची भेट घ्यायचे.

ANI ट्विट

दरम्यान, आनंद सिंह बिष्ट यांच्या गावीच पैतृक घाट येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. देशभरात सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन जारी आहे त्यामुळे गर्दी न करता हे सर्व विधी केले जातील.