टाटा नॅनो फॅमिली ईव्ही 3.99 लाखांत लाँच झाली आहे का? सोशल मीडियावरील व्हायरल फोटोंचे सत्य जाणून घ्या

सोशल मीडियावर टाटा नॅनो फेसलिफ्ट ईव्ही कार अवघ्या 3.99 लाख रुपयांत आणि 300 किमी रेंजसह लाँच झाल्याचा दावा करणारे फोटो जोरदार व्हायरल होत आहेत. मात्र, हे फोटो पूर्णपणे बनावट आणि एआय द्वारे तयार करण्यात आलेले आहेत.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (ट्विटर) आणि इतर माध्यमांवर सध्या टाटा मोटर्सच्या प्रसिद्ध 'टाटा नॅनो' कारच्या इलेक्ट्रिक व्हेरियंटबाबत एक पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हायरल पोस्टमध्ये असा दावा केला जात आहे कि, टाटा मोटर्सने भारतीय बाजारपेठेत 'टाटा नॅनो फेसलिफ्ट ईव्ही' (Tata Nano Facelift EV) अवघ्या ३.९९ लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच केली आहे. तसेच ही कार एका चार्जमध्ये ३०० किलोमीटर धावणार असल्याचेही म्हटले जात आहे. मात्र, तपासाअंती हा दावा पूर्णपणे खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याचे समोर आले आहे.

सोशल मीडियावरील व्हायरल दावा काय आहे?

व्हायरल होत असलेल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये अत्यंत आधुनिक आणि लूक असणाऱ्या एका लहान कारचे फोटो शेअर केले गेले आहेत. या कारला टाटा नॅनोचे इलेक्ट्रिक फेसलिफ्ट मॉडेल म्हटले जात आहे. पोस्टमध्ये या कारची किंमत ३.९९ लाख रुपये, अत्याधुनिक डिझाईन आणि मध्यमवर्गीयांसाठी परवडणारी सर्वोत्तम कार असे वैशिष्ट्ये सांगण्यात आले आहेत. यासोबतच युजर्सना विचारण्यात आले आहे की, पहिल्याच महिन्यात या कारला किती बुकिंग्स मिळतील. यामुळे अनेकांना ही कार खरोखरच बाजारात येत असल्याचा भास झाला.

फोटोंचे खरे सत्य: एआय निर्मित संकल्पना

तपासणीदरम्यान असे स्पष्ट झाले आहे की, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले टाटा नॅनो कारचे फोटो कोणत्याही खऱ्या उत्पादनाचे किंवा गाडीचे नाहीत. हे फोटो कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर करून डिझाइन करण्यात आलेले 'कन्सेप्ट रेंडर्स' (Concept Renders) आहेत. डिजिटल आर्टिस्ट किंवा युजर्सनी एआय टूल्सचा वापर करून टाटा नॅनोचे एक काल्पनिक इलेक्ट्रिक मॉडेल तयार केले आहे, ज्याचा प्रत्यक्ष टाटा मोटर्स कंपनीशी कोणताही संबंध नाही.

टाटा मोटर्सची कोणतीही अधिकृत घोषणा नाही

टाटा मोटर्सकडून टाटा नॅनो फेसलिफ्ट ईव्ही किंवा अशा प्रकारच्या ३.९९ लाख रुपयांच्या कोणत्याही इलेक्ट्रिक कारच्या लाँचिंगबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. टाटा मोटर्स सध्या भारतीय बाजारपेठेत आपला इलेक्ट्रिक वाहनांचा (EV) पोर्टफोलिओ झपाट्याने वाढवत असली, तरी त्यांनी नॅनो कार पुन्हा नव्या रूपात आणण्याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement