Taj Mahal in Agra Received Bomb Threat: ताजमहल बॉम्ब ने उडवण्याची धमकी; सुरक्षाव्यवस्थेमध्ये वाढ
धमकीचा मेल आल्यानंतर आज ताजमहालच्या सुरक्षेसाठी एकीकडे आग्रा पोलिसांनी बाहेरील भागात तर सीआयएसएफने ताजमहालच्या आत सखोल तपासणी सुरू केली आहे.
देशातलं सर्वात प्रतिष्ठित आणि जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेलं ताजमहल (Taj Mahal) उडवण्याची धमकी आली आहे. पर्यटन विभागाच्या मेल वर ताजमहल मध्ये बॉम्बस्फोट (Bomb Threat) घडवून आणण्याचा ईमेल आला आहे. या मेल नंतर सुरक्षा यंत्रणा तातडीने घटनास्थळी पोहचली आहे. आता ताजमहलच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये वाढ करण्यात आली आहे. आग्रा पोलिस सध्या मेल कुठून आला याचा तपास करत आहेत.
धमकीचा मेल आल्यानंतर आज ताजमहालच्या सुरक्षेसाठी एकीकडे आग्रा पोलिसांनी बाहेरील भागात तर सीआयएसएफने ताजमहालच्या आत सखोल तपासणी सुरू केली आहे. यासाठी श्वानपथक आणि बॉम्बशोधक पथकालाही पाचारण करण्यात आले आहे.
रिपोर्ट्सनुसार, पर्यटन विभागाच्या अधिकृत ईमेलवर ही धमकी देण्यात आली असून या ईमेलमध्ये ताजमहालच्या आत बॉम्ब ठेवण्यात आल्याचे लिहिले आहे. या बॉम्बच्या स्फोटाची वेळ सकाळी नऊ वाजता निश्चित करण्यात आली आहे. सोबतच हे थांबवता येत असेल तर थांबवा, असे आव्हानही देण्यात आले आहे. हा मेल पर्यटन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वाचताच त्यांनी वरिष्ठांना कळवले. यानंतर या प्रकरणाची माहिती तात्काळ स्थानिक पोलीस, सीआयएसएफ आणि पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली.