भारतात 4213 नवे COVID-19 रुग्ण, आतापर्यंतची सर्वात मोठी रुग्णसंख्येत वाढ

यात सध्या 44,029 रुग्णांवर उपचार सुरु असून 20,917 रुग्ण बरे होऊन त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे

Coronavirus (Photo Credits: Pixabay)

भारताता कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून हा आकडा आता 67,000 च्या वर जाऊन पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत भारतात 4213 नवे कोरोना संक्रमित रुग्ण आढळले असून देशात कोरोना बाधितांची एकूण संख्या 67,152 इतकी झाली आहे. यात सध्या 44,029 रुग्णांवर उपचार सुरु असून 20,917 रुग्ण बरे होऊन त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. तर आतापर्यंत एकूण 2206 रुग्ण दगावल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. ही आकडेवारी लक्षात घेता देशातील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचे सांगण्यात येत आहे.

देशात सर्वाधिक कोरोना बाधित रुग्ण महाराष्ट्र राज्यात असून येथे 22,171 रुग्ण आढळले आहेत. त्यापोठापठ गुजरातमध्ये 8194 रुग्ण आढळले असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. तर दिल्लीत 6923 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. Coronavirus: दिल्लीत गेल्या 24 तासांत 56 ITBP जवानांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह

याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)आज दुपारी 3 वाजता देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरसिंग च्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. यामध्ये कोरोनाशी लढा देण्यासाठी देशाची पुढील रुपरेषा काय असेल याबाबत चर्चा केली जाईल.

त्यासोबतच लॉकडाऊनबाबतही महत्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता आहे. सध्या संपूर्ण देश कोरोनासारख्या महामारीविरोधात मोठा लढा देत आहे. हा लढा यशस्वी होण्यासाठी सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत.

लॉक डाऊनचा तिसरा टप्पा म्हणजेच 4 मे ते 17 मे पर्यंत असणाऱ्या या लॉक डाऊन मध्ये अनेक राज्यातील उद्योग धंद्यांना सूट देण्यात आली आहे. मात्र तरीही रोजंदारीवर जगणा-या स्थलांतरित मजूरांपुढे भूकमारीची समस्या निर्माण झाल्यामुळे अनेकांनी गावाकडचा रस्ता धरला आहे.