Shocking! कोविडच्या भीतीमुळे महिलेने 10 वर्षांच्या मुलासह स्वतःला तीन वर्षे घेतले कोंडून; पतीलाही येऊ दिले नाही

यानंतर दोघांनाही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. रुग्णालयाच्या मानसोपचार विभागातील डॉक्टरांसह इतर डॉक्टरांनी आई आणि मुलाची तपासणी केली.

Coronavirus | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

कोविड (Coronavirus) संसर्गाच्या भीतीने गुडगाव (Gurugram) पोलीस स्टेशन सेक्टर-29 परिसरातील मारुती विहार सोसायटीमध्ये एका महिलेने स्वत:ला आणि तिच्या 10 वर्षाच्या मुलाला तीन वर्षांपासून घरात कोंडून घेतले होते. आता तब्बल तीन वर्षांनंतर महिलेच्या पतीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोग्य विभागाच्या पथकासह महिला आणि तिच्या मुलाला घरातून बाहेर काढले. सेक्टर-10 येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये महिला आणि मुलाची प्राथमिक तपासणी केल्यानंतर दोघांनाही रोहतक येथील पंडित भागवत दयाल पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल इन्स्टिट्यूटमध्ये पाठवण्यात आले आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार ही महिला मानसिक त्रासाने त्रस्त आहे.

माहितीनुसार, सुजन मांजी हा मूळचा पश्चिम बंगालचा रहिवासी मारुती विहार कॉलनीत त्याची पत्नी मुनमुन मांजी आणि 10 वर्षांचा मुलगा शोभितसोबत राहतो. कोविड संसर्गावेळी 2020 मध्ये लॉकडाऊन असताना सुजन मांजी याने संपूर्ण कोविड प्रोटोकॉलचे पालन केले होते. परंतु काही दिवसांनंतर, कोविड नियम शिथिल केल्यानंतर, संसर्ग पसरण्याच्या भीतीने मुनमुनने स्वतःला आणि तिच्या मुलाला फ्लॅटमध्ये कोंडून घेतले. पती सुजन मांझी यांनीही फ्लॅटमध्ये येण्यास नकार दिला.

मुनमुनने युक्तिवाद केला की, सुजन ऑफिसला जातो, त्यामुळे बाहेरून घरात संसर्ग येऊ शकतो. सुजनने घरच्यांशी, नातेवाईकांशी, सासरच्यांशी फोनवर बोलून मुनमुनला समजावण्याचा प्रयत्न केला पण तिने काहीच ऐकले नाही. यानंतर सुजन याच सोसायटीत एक फ्लॅट भाड्याने घेऊन राहू लागला. या तीन वर्षांत सुजन पत्नी मुनमुन आणि मुलासाठी रेशन, भाजीपाला, दूध आदी दैनंदिन गरजेच्या वस्तू मुनमुनच्या फ्लॅटबाहेर ठेवत असे.

या दरम्यान वीजबिल, भाडे आदी तो भरत राहिला. मुलाचे क्लासेस फोनवर चालू होते. मुनमुनचे म्हणणे होते की, जोपर्यंत 12 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी लस लागू होत नाही, तोपर्यंत ती आणि तिचा मुलगा घराबाहेर येणार नाहीत. आता कोविडपासून बऱ्याच अंशी दिलासा मिळाल्यावर पतीने पुन्हा एकदा फ्लॅट उघडून मुलाला बाहेर पडू देण्याची मागणी केली होती, परंतु मुनमुनने आताही त्यास नकार दिला होता. (हेही वाचा: Raipur Shocker: लग्नाच्या रिसेप्शनपूर्वी नवविवाहित जोडप्याचा संशयास्पद मृत्यू, तपास सुरू)

अखेर नाईलाजाने सुजनने पोलिसांना संपूर्ण प्रकार सांगून दाद मागितली. शेवटी पोलिसांनी या आई-मुलाला घराबाहेर काढले. यानंतर दोघांनाही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. रुग्णालयाच्या मानसोपचार विभागातील डॉक्टरांसह इतर डॉक्टरांनी आई आणि मुलाची तपासणी केली. मेंटल मेडिसिन विभागाचे डॉ.विनय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मूल पूर्णपणे निरोगी आहे मात्र महिलेला मानसिक त्रास असल्याचे त्यांनी सांगितले.