Vaishali Darekar: ज्यांनी खासदार केले तेच शिवसैनिक पराभूतही करतील, शिवसेना (UBT) उमेदवार वैशाली दरेकर यांचा शिंदे पितापुत्रांवर निशाणा
राज ठाकरे यांनी शिवसेना सोडल्यानंतर वैशाली दरेकर या राज ठाकरे यांच्यासोबत मनसेमध्ये गेल्या. 2009 मध्ये त्यांनी मनसेमधून लोकसभा निवडणूक देखील लढवली होती.
श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) हे दोनदा खासदार झाले ते शिवसैनिकांमुळे, ज्या शिवसैनिकांनी त्यांना खासदार केलं तेच शिवसैनिक आता त्यांचा पराभव करतील असं सांगत ठाकरे गटाच्या कल्याणच्या उमेदवार वैशाली दरेकर (Vaishali Darekar) यांनी खासदार श्रीकांत शिंदे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टिका केली. श्रीकांत शिंदेंची हॅट्रिक होणार नाही, समोर चांगला बॉलर असेल तर कधी कधी हॅट्रिक चुकते असा टोला त्यांनी लावला. कल्याण लोकसभा मतदारसंघात यंदा चुरशीची लढत पाहायला मिळणार असल्याचं चित्र आहे. शिवसेना शिंदे गटाकडून मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जवळपास निश्चित आहे. तर . शिवसेना ठाकरे गटाकडून कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी वैशाली दरेकर यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. ( Loksabha Election 2024: उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (UBT) पक्षाकडून कल्याण, जळगावसह चार ठिकाणचे उमेदवार जाहीर, पाहा यादी)
माझ्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीला उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आनंद झाला आहे. लोकांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. उद्धव ठाकरे देतील ती जबाबदारी पार पाडणार, मी शिवसेनेची खासदार म्हणून लोकसभेत जाणार असा विश्वास वैशाली दरेकर यांनी व्यक्त केला. श्रीकांत शिंदे यांनी आतापर्यंत ज्या शिड्या पार केल्या त्यासाठी त्यांना उद्धव ठाकरेंनी मदत केली आहे. ज्या शिवसैनिकांनी श्रीकांत शिंदे यांना दोन वेळा खासदार केलं तेच शिवसैनिक आता त्यांना पाडणार. असे विधान देखील त्यांनी केले.
वैशाली दरेकर यांच्या राजकारणाची सुरुवात शिवसेनेमधूनच झाली होती. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडल्यानंतर वैशाली दरेकर या राज ठाकरे यांच्यासोबत मनसेमध्ये गेल्या. 2009 मध्ये त्यांनी मनसेमधून लोकसभा निवडणूक देखील लढवली होती. त्यानंतरच्या काळात त्यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. वैशाली दरेकर यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत अनेक संघटनात्मक पदे आणि महापालिकेचे विरोधी पक्षनेतेपद देखील भूषवले.