Maratha Reservation: शिंदे–फडणवीस–पवार या दुतोंडी सरकारच्या ढोंगाचा बुरखा फाडला; सामनातून सरकारवर जोरदार टिका

मुख्यमंत्री हे खोटे बोलण्यात वस्ताद आहेत. आधी तुमची पोपटपंची बंद करा व जालन्यातील मराठा आंदोलकांवर गोळय़ा चालवण्याचे, अमानुष लाठीमार करण्याचे आदेश कोणी दिले ते सांगा, असा प्रश्न सामना अग्रलेखातून उपस्थित करण्यात आला आहे.

Eknath Shinde, Devendra Fadnavis | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्य़ातील अंतरवली येथे सुरू असलेल्या उपोषणादरम्यान आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराचे तीव्र पडसाद उमटत आहेत. राज्याच्या विविध भागांत बंद, रास्ता रोको केला जात असल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक सोमवारी मुंबईत झाली. जालना जिल्ह्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांनी केलेला लाठीमार दुर्दैवी असून निष्पाप नागरिकांना झालेल्या मारहाण- प्रकरणी राज्य सरकारने सोमवारी माफीनामा सादर करत मराठा समाजाला शांत करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रातून सरकारवर जोरदार टीका करण्यात आली आहे. (हेही वाचा - Raj Thackeray On Maratha Reservation: लाठीचार्जचे आदेश देणाऱ्यांना मराठवाड्यात येऊ देऊ नका; राज ठाकरेंनी आंदोलकांची भेट घेऊन व्यक्त केला हिंसाचाराचा निषेध)

मुख्यमंत्री शिंदे म्हणतात, मराठा समाजाच्या वेदनांची मला पूर्ण जाण आहे. मुख्यमंत्री हे खोटे बोलण्यात वस्ताद आहेत. आधी तुमची पोपटपंची बंद करा व जालन्यातील मराठा आंदोलकांवर गोळय़ा चालवण्याचे, अमानुष लाठीमार करण्याचे आदेश कोणी दिले ते सांगा, असा प्रश्न सामना अग्रलेखातून उपस्थित करण्यात आला आहे.

तुम्ही खरे मराठा! एका तोंडाने आंदोलकांवर लाठय़ा–गोळय़ा चालवायचे आदेश द्यायचे व दुसऱ्या तोंडाने मला तुमच्या वेदनांची जाण आहे, असे सांगायचे हे ढोंग आहे. जालन्याच्या आंतरवाली गावातील मनोज जरांगे–पाटलांनी शिंदे–फडणवीस–पवार या दुतोंडी सरकारच्या ढोंगाचा बुरखा फाडला आहे, असा टोलाही सामनातून सरकारला लगावण्यात आला आहे.

भाजपचे आमदार नितेश राणे काँग्रेस पक्षात असताना जे म्हणाले तेच खरे, फडणवीस मराठय़ांना आरक्षण देणार नाहीत. हे हाफ चड्डीवाल्यांचे सरकार आहे. राणे आज भाजपात आहेत. त्यांचे तेच मत कायम असावे, पण त्या हाफ चड्डीवाल्या सरकारची नाडी एका सामान्य जरांगे-पाटलांनी खेचली तेव्हा त्यांच्यावर निर्घृण हल्ला केला, अशी टीकाही करण्यात आली आहे.