Serial Killer in Uttar Pradesh: उत्तर प्रदेशात सीरियल किलरने 14 महिन्यात 9 महिलांची एकाच पद्धतीने हत्या; बरेली ग्रामीण भागात दहशत
शेतात गळा दाबून पीडित महिलांची हत्या केली जात आहे.
उत्तर प्रदेशच्या बरेली जिल्ह्यातील ग्रामीण भागात सध्या एका सिरीयल किलरची दहशत पहायला मिळाली. या परिसरात मागच्या 14 दिवसांत नऊ महिलांचा हत्या झाल्यानंतर परिसरात दहशत पसरली आहे. नऊ महिलांचा खून एकाच पद्धतीने झाल्यामुळे सीरियल किलर यामागे असावा असा कयास बांधला जात आहे. बरेली ग्रामीण भागातील 25 किमीच्या परिघात आणि दोन पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या गावात सदर गुन्हा घडल्यामुळे या भागातील लोकांमध्ये सध्या घबराट पसरली आहे. (हेही वाचा - Shocking: बिहारच्या मुझफ्फरपूरमध्ये यूट्यूब व्हिडिओ पाहून मुले बनवत होती बॉम्ब; अचानक झालेल्या स्फोटात 5 जण जखमी (Video))
उत्तर प्रदेशच्या बरेली जिल्ह्यातील ग्रामीण भागात सर्व पीडित महिला या 45 ते 55 या वयोगटातील आहेत. शेतात गळा दाबून पीडित महिलांची हत्या केली जात आहे. महिलाच्या शरीरावरील कपडे इतरत्र विखुरलेले पाहायला मिळाले. मात्र कुणावरही लैंगिक अत्याचार झाल्याचे दिसून आले नाही. सर्व हत्यांची पद्धत सारखीच असल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणी पोलिसांनी तीन संशयित आरोपींना अटक केली आहे. मात्र ते तिघे खरे गुन्हेगार नसावेत, असा तपास यंत्रणांना संशय आहे. कारण ते तुरंगात असतानाही हत्या झालेल्या आहेत. पोलीस अधीक्षक मनुष पारीक म्हणाले की, अलीकडे 2 जुलै रोजी शाही पोलीस ठाण्याच्या हद्दीत ऊसाच्या शेतात एका महिलेचा मृतदेह आढळून आला. हा मृतदेह मिळाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून विविध पथके नियुक्त करून तपास सुरू करण्यात आला आहे.