Road Accident News: देशात रस्ते अपघातात तब्बल 12 टक्क्यांनी वाढ

याशिवाय, मद्यपान करून वाहन चालवणे आणि वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करणे, अशा कारणांमुळे रस्ते अपघातांच्या घटना वाढल्या आहेत.

Road Accidents | Representational Image (Photo Credits: Pixabay)

गेल्या वर्षभरात देशात रस्ते अपघातांच्या (Road Accident) घटना वाढल्या आहेत. दररोज होणाऱ्या किरकोळ तसेच गंभीर स्वरुपाच्या अपघातात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. वाहतुकीच्या नियमात अनेक बदल करण्यात आले असले तरी अनेक नागरिक सर्रास वाहतुकीच्या नियमांचे उल्लांघन करण्यात येत आहे. गेल्या वर्षभरात रस्ते अपघातात तब्बल 12 टक्के वाढ झाल्याचं केंद्राकडून (Central Govt) सांगण्यात आलं आहे. या अपघातांची अनेक धक्कादायक कारणे देखील या अहवालात नमूद करण्यात आली आहे.   (हेही वाचा - Telangana Accident: हनुमाकोंडा जवळ बसची झाडाला धडक, गर्भवती महिलेसोबत 25 जण जखमी)

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या वर्षात म्हणजेच 2022 मध्ये देशात एकूण 4,61,312 किरकोळ तसेच गंभीर स्वरुपाच्या रस्ते अपघातांची नोंद झाली. यामध्ये 1,68,491 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 4,43,366 लोक अपघाताच्या घटनेत जखमी झाले. मागील वर्षाच्या म्हणजेच 2021 च्या तुलनेत या आकडेवारीत तब्बल 11.9 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याचबरोबर मृतांमध्ये 9.4 टक्के आणि जखमींच्या संख्येत 15.3 टक्के वाढ झाली आहे.

अती वेग तसेच धोकादायक पद्धतीने वाहन चालवणे हे रस्ते अपघातांचे सर्वात मोठे कारण असल्याचं रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे. याशिवाय, मद्यपान करून वाहन चालवणे आणि वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करणे, अशा कारणांमुळे रस्ते अपघातांच्या घटना वाढल्या आहेत.