Republic Day Parade 2020: प्रजासत्ताक दिन परेड साठी महाराष्ट्र, केरळ यांना वगळून 'या' 16 राज्यांच्या चित्ररथाला मिळाली संधी; संरक्षण दलाने जाहीर केली यादी
संरक्षण दलातर्फे (Ministry Of Defence) प्रजासत्ताक दिनाच्या परेड साठी निवडण्यात आलेल्या 16 राज्य व केंद्रशासित प्रदेशांची तसेच 6 मंत्रालयांची यादी जाहीर करण्यात आली.
नवी दिल्ली: प्रजासत्ताक दिना (Republic Day 2020) निमित्त दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा राजपथावर परेडचे आयोजन करण्यात आले आहे, या परेडसाठी महाराष्ट्र (Maharashtra) , केरळ (Keral) व पश्चिम बंगाल (West Bengal) या राज्यांच्या चित्ररथाचे प्रस्ताव नाकारल्याने काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चा होत्या. अशातच आज,संरक्षण दलातर्फे (Ministry Of Defence) परेड साठी निवडण्यात आलेल्या 16 राज्य व केंद्रशासित प्रदेशांची तसेच 6 मंत्रालयांची यादी जाहीर करण्यात आली. प्राप्त माहितीनुसार, संरक्षण दलाकडे यंदाच्या परेड साठी एकूण 32 राज्य आणि 24 मंत्रालय व अंतर्गत विभागांनी चित्ररथ सहभागी करण्यासाठी प्रस्ताव धाडले होते.
संरक्षण दलातर्फे निवडलेल्या राज्यांमध्ये, आंध्रा प्रदेश, आसाम, छत्तीसगढ, गोवा, गुजरात, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, कर्नाटक, मध्य प्रदेश, मेघालय, ओडिशा, पंजाब, राजस्थान, तामिळनाडू, तेलंगणा, आणि उत्तर प्रदेश यांचा समावेश आहे. तर निवड झालेल्या सहा मंत्रालयीन विभागात गृह व मंत्रालयांतर्गत उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन विभाग, पेयजल व स्वच्छता विभाग, वित्तीय सेवा विभाग, राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (एनडीआरएफ) आणि केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग (सीपीडब्ल्यूडी) आणि मंत्रालय शिपिंग यांचा समावेश आहे.
ANI ट्विट
दरम्यान, संरक्षण दलाने निवडीचा निर्णय हा पाच बैठकांमध्ये घेण्यात आल्याचे स्पष्ट केले.मात्र वगळलेल्या राज्यातून या निर्णयाचा विरोध करत नरेंद्र मोदी यांचे सरकार दुजाभाव करत असल्याचा आरोप करण्यात आला होता, ज्या राज्यातून नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध झाला त्यांच्याबाबतीत हा विरुद्ध निर्णय घेणयात आला तर महाराष्ट्रात सत्ता हातून गेल्यामुळे हा बदला घेतला जात आहे असेही काहींनी म्हंटले आहे. या मध्ये महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या सुप्रिया सुळे आणि पश्चिम बंगालमधून तृणमूल काँग्रेस नेत्यांनी या निर्णयाचा उघडपणे विरोध केला.