ग्रामीण LPG ग्राहकांसाठी खुशखबर! आता 45 नव्हे, फक्त 25 दिवसांतच सिलेंडर बुकिंग
केंद्र सरकारने ग्रामीण भागातील घरगुती एलपीजी सिलेंडर बुकिंगसाठी असलेला ४५ दिवसांचा नियम रद्द करत आता २५ दिवसांचा नियम लागू केला आहे. दरम्यान, कमर्शियल गॅस सिलेंडरच्या दरात मात्र वाढ करण्यात आली आहे.
आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि पुरवठा साखळीतील बदलांचा थेट परिणाम भारतातील गॅस वितरण व्यवस्थेवर होत असतो. याच पार्श्वभूमीवर ग्राहकांच्या गरजा आणि बाजारातील बदलती परिस्थिती लक्षात घेऊन केंद्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ग्रामीण भागातील घरगुती एलपीजी सिलेंडर बुकिंगसाठी (LPG refill booking interval ) लागू असलेला 45 दिवसांचा नियम रद्द करण्यात आला असून, आता ग्रामीण ग्राहकांनाही 25 दिवसांनी सिलेंडर बुक करता येणार आहे.
शहरी भागाप्रमाणेच नियम लागू
शहरी भागातील ग्राहकांसाठी सिलेंडर रिफिल बुकिंगसाठी २५ दिवसांचे अंतर आधीपासूनच लागू होते. आता हाच नियम ग्रामीण भागातील ग्राहकांनाही लागू करण्यात आला आहे. केंद्रीय पेट्रोलियम राज्यमंत्री सुरेश गोपी यांनी सोमवारी ही माहिती दिली. सर्व ऑइल मार्केटिंग कंपन्यांना हा नवीन नियम तात्काळ लागू करण्याचे निर्देश सरकारने दिल्याचे त्यांनी सांगितले.
इराण युद्धाच्या काळात लागू झाले होते निर्बंध
अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धादरम्यान जागतिक स्तरावर एलपीजी पुरवठ्यावर मोठा दबाव निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर ९ मार्च २०२६ रोजी शहरी भागातील रिफिल बुकिंगचे अंतर २५ दिवसांवर आणण्यात आले होते, तर १२ मार्च रोजी ग्रामीण भागातील हे अंतर ४५ दिवसांपर्यंत वाढवण्यात आले होते. पुरवठ्यावरील ताण लक्षात घेता ही तात्पुरती उपाययोजना करण्यात आली होती.
पुरवठा सुधारल्याने निर्णय मागे
सध्या देशातील एलपीजी पुरवठ्याची स्थिती सुधारली असून, प्रलंबित बुकिंगची संख्याही लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. याच सुधारणेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ग्रामीण भागातील ग्राहकांवर लादलेले हे निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला आहे.
कमर्शियल गॅस सिलेंडर मात्र महागला
दुसरीकडे, १ सप्टेंबर रोजी तेल कंपन्यांनी कमर्शियल एलपीजी सिलेंडरच्या किमतीत ११.५० रुपयांची वाढ केली आहे. याशिवाय ५ किलो वजनाचा छोटा सिलेंडरही २ रुपयांनी महाग झाला असून, त्याची सध्याची किंमत ७६४ रुपये झाली आहे.
हॉटेल आणि रेस्टॉरंट चालकांवर परिणाम होण्याची शक्यता
कमर्शियल सिलेंडरच्या दरवाढीमुळे रेस्टॉरंट आणि ढाबा चालवणाऱ्या व्यावसायिकांचा इंधन खर्च काही प्रमाणात वाढणार आहे. या वाढत्या खर्चाचा भार ग्राहकांवर टाकत व्यावसायिक चहा, समोसा आणि नाश्त्याच्या पदार्थांच्या किमतीत वाढ करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.