Ram Temple in Ayodhya: अयोध्येमध्ये 1 जानेवारी 2024 ला राम मंदिर तयार झालेले दिसेल; Amit Shah यांची माहिती (Watch)
परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राम मंदिराच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराच्या उभारणीला पुढे नेले.
आज त्रिपुरामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी अयोध्येत बांधले जात असलेले राम मंदिर (Ram temple in Ayodhya) कधी तयार होणार याची घोषणा केली. 1 जानेवारी 2024 पर्यंत राम मंदिर तयार होईल, असे शाह म्हणाले. त्रिपुरातील निवडणूक रॅलीदरम्यान गृहमंत्र्यांनी राम मंदिर उभारणीची तारीख उघड केली आहे. त्रिपुरातील जनविश्वास यात्रेअंतर्गत जाहीर सभेत अमित शहा म्हणाले की, ‘2019 मध्ये मी भाजपचा अध्यक्ष होतो आणि राहुल बाबा काँग्रेसचे अध्यक्ष होते, ते दररोज मंदिराबद्दल विचारायचे की, 'मंदिर बनवणार पण तारीख सांगणार नाही.’ आता राहुल बाबा, कान उघडून ऐका, 1 जानेवारी 2024 ला तुम्हाला अयोध्येत राम मंदिर उभा असलेले दिसेल.
शाह म्हणाले की, काँग्रेसने राम मंदिराचा मुद्दा बराच काळ न्यायालयात अडकवून ठेवला. परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राम मंदिराच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराच्या उभारणीला पुढे नेले. नोव्हेंबर 2019 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने अयोध्येतील वादग्रस्त जागेवर राम मंदिर उभारणीचा मार्ग मोकळा केला. यासोबतच मशिदीच्या बांधकामासाठी 5 एकरचा भूखंड देण्याचे निर्देशही केंद्र सरकारला देण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 ऑगस्ट 2020 रोजी अयोध्येत राम मंदिराच्या बांधकामाचे भूमिपूजन केले होते.
आज केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी काश्मीरमधून कलम 370 हटवण्याबाबत विरोधकांनी केलेल्या टीकेवरही जोरदार निशाणा साधला. शाह म्हणाले, कलम 370 बाबत असे म्हटले होते की, ते हटवल्यावर रक्ताच्या नद्या वाहतील. पण रक्ताच्या नद्या तर दूरच, कोणाची दगडफेक करण्याचीही हिंमत झाली नाही. पुलवामा हल्ल्यानंतर भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकबद्दल गृहमंत्र्यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर निशाणा साधत म्हटले, ‘पंतप्रधान मोदी मौनी बाबा मनमोहन सिंग नाहीत, ते नरेंद्र मोदी आहेत. अवघ्या 10 दिवसांत पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राइक करून त्यांना धडा शिकवला.’
दुसरीकडे, त्रिपुराच्या विकासाबाबत अमित शहा म्हणाले की, आम्हाला आणखी पाच वर्षे द्या, आम्ही छोट्या राज्यांमध्ये त्रिपुराला सर्वात समृद्ध करू. ते म्हणाले की, त्रिपुरात केलेले काम केवळ ट्रेलर आहे, चित्रपट अजून बाकी आहे. दरम्यान, त्रिपुरामध्ये पुढील महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू झाला आहे. (हेही वाचा: खुशखबर! आता मोफत धान्यानंतर सरकार देणार फ्री डिश टीव्ही, जाणून घ्या सविस्तर)
भारतीय जनता पक्षाची 'जनविश्वास यात्रा' सर्व 60 मतदारसंघांतून 1,000 किलोमीटरचे अंतर कापून आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारच्या कामगिरीवर प्रकाश टाकेल. 12 जानेवारीला यात्रेची सांगता होणार असून त्याअंतर्गत एकूण 100 रॅली आणि रोड शोचे आयोजन करण्यात येणार आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा शेवटच्या दिवशी यात्रेत सामील होतील.