Rajkot Gaming Zone Fire: राजकोट गेमिंग झोनकडे अग्निशमन विभागाचा परवानाच नव्हता, आपत्कालीन परिस्थितीत बाहेर पडण्यासाठीही होता एकच दरवाजा; तपासात धक्कादायक खुलासा
मृतदेह ओळखण्यापलीकडे जळाले आहेत आणि ओळखीसाठी पीडित आणि त्यांच्या नातेवाईकांचे डीएनए नमुने गोळा करण्यात आले आहेत
गुजरातच्या राजकोट शहरातील एका गेमिंग झोनमध्ये शनिवारी संध्याकाळी भीषण आग लागली. यामध्ये जवळपास 28 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. टीआरपी गेम झोन येथे लागलेल्या आगीत अनेक लहान मुले आणि मोठी माणसे अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. उपलब्ध माहितीनुसार, गेमिंग झोनमध्ये प्रवेश आणि बाहेर पडण्यासाठी एकच मार्ग होता. याशिवाय झोनच्या विविध कप्प्यांमध्ये हजारो लिटर पेट्रोल आणि डिझेलचा साठा करण्यात आला होता. यामुळे आग झपाट्याने पसरली आणि परिणामी संपूर्ण इमारत जळून खाक झाली. ( Rajkot Gaming Zone Fire: राजकोटच्या TRP Mall च्य गेमिंग झोनमध्ये भीषण आग; 20 हून अधिक लोकांच्या मृत्यूची शक्यता, बचावकार्य सुरु (Video) )
आतापर्यंत नऊ मुलांसह 28 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. मृतदेह ओळखण्यापलीकडे जळाले आहेत आणि ओळखीसाठी पीडित आणि त्यांच्या नातेवाईकांचे डीएनए नमुने गोळा करण्यात आले आहेत, असे विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) सदस्यांनी सांगितले. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी रविवारी आगीच्या ठिकाणी जाऊन मदतकार्याची माहिती घेतली. बचाव कार्याची दखल घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पटेल यांच्याशी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 4 लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपयांची भरपाई जाहीर केली आहे.
गेमिंग झोनमधील एकमेव एंट्री-एक्झिट पॉइंट सहा-सात फूट उंच होता. 99 रुपये प्रति प्रवेश योजनेमुळे शनिवारी या ठिकाणी मोठी गर्दी झाली होती. शिवाय, पहिल्या मजल्यावरून बाहेर पडण्याचा एकच मार्ग होता. जनरेटरसाठी टीआरपी गेम झोनमध्ये जवळपास 2,000 लिटर डिझेल साठवले गेले होते, तर गो-कार्ट रेसिंगसाठी 1,000 ते 1,500 लिटर पेट्रोल साठवले गेले होते.