Rajasthan Political Crisis: पायलट नसताना मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या नेतृत्वात राजस्थान काँग्रेस सरकारचे विमान अस्थिर

सचिन पायलट आपल्या राजकीय कारकिर्दीचे विमान कोणत्या दिशेने उडवणार याबाबत बरीच उत्सुकता आहे. दरम्यान, काँग्रेसमधून हकालपट्टी झाल्यावर पायलट यांनी 'सत्याला त्रास देता येऊ शकतो.. पराभूत नाही ' असे ट्विट केले आहे.

Rajasthan Political Crisis: पायलट नसताना मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या नेतृत्वात राजस्थान काँग्रेस सरकारचे विमान अस्थिर
Ashok Gehlot, Sachin Pilot | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

सचिन पायलट (Sachin Pilot) यांच्या बंडाचे पर्यावसन काँग्रेस (Congress) पक्षातून त्यांची हकालपट्टी होण्यात झाले आहे. सचिन पायलट यांची राजस्थानचे उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस पक्षातील विविध पदांवरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री अशोक गहलोत (Ashok Gehlot) यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकार राजस्थानमध्ये किती स्थिर आहे? याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या प्रश्नाचे उत्तर शोधताना पुन्हा एकदा आकड्यांचे गणित कसे जमते यावर बरेच काही अवलंबून राहते. राजकीय विश्लेषक आणि अभ्यासकांची मते आणि खुद्द काँग्रेस नेते यांनी प्रसारमाध्यमांना दिलेली प्रतिक्रिया पाहता आजघडीला तरी अशोक गहलोत यांचे पारडे जड आहे. अल्पमतात असले तरी काँग्रेस सरकारला कोणता धोका नाही असे दिसते.

राजस्थान विधानसभा पक्षीय बलाबल

 

एकूण सदस्य संख्या -200

काँग्रेस- 107

भाजप- 72

अपक्ष- 13

इतर पक्ष - 8

राजस्थान विधानसभेची एकूण सदस्य संख्या 200 आहे. कोणत्याही पक्षाला अथवा आघाडीला सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी किंवा सरकार चालवण्यासाठी 101 आमदारांचे पाठबळ असणे आवश्यक आहे. काँग्रेस आमदारांची एकूण संख्या 107 इतकी आहे. सचिन पायलट यांचा दावा असा की त्यांना 25 आमदारांचा पाठिंबा आहे. दुसऱ्या बाजूला अशोक गहलोत यांचा दावा असा की त्यांना 102 आमदारांचा पाठींबा आहे. यात काही अपक्षांचाही समावेश आहे. त्यामुळे दोन्ही नेत्यांचा दावा जरी गृहीत धरला तरी अशोक गहलोत यांचे सरकार कायम राहण्याची शक्यता स्पष्ट दिसते. असे असले तरी आकडेवारी स्पष्ट सांगते की, गहलोत यांचे सरकार अल्पमतात आहे. (हेही वाचा, सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्री, राजस्थान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवले- रणदीप सिंह सुरजेवाला यांची घोषणा)

दरम्यान, गेले दोन दिवस राजस्थानमधील राजकीय गुंता वाढला असला तरी कोणतीही प्रतिक्रिया देणे सचिन पायलट यांनी टाळले आहे. 'आपण नाराज आहोत मात्र भाजप प्रवेश करणार नाही' ही एकमेव प्रतिक्रिया पायलट यांच्याकडून पुढे आली होती. दरम्यान, विचार करण्यास पूरेसा वेळ घेऊन आणि देऊन काँग्रेस पक्षाने पायलट यांच्यावर कारवाई करत हकालपट्टी केली. त्यानंतर पायलट पुढे काय करणार याबाब उत्सुकता आहे. कारण पायलट यांनी तिसरी आघाडी बनवायची म्हटले तरी त्यांना भाजप आणि अपक्षांचे सहकार्य घ्यावे लागणार. असे होऊन समजा बहुमताचा आकडा गाठला तरीही सत्तेवर येणारे सरकार हे अल्पमतातच येणार हे निश्चित आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजस्थान सरकारवर अनिश्चिततेचे सावट राहणार. त्यामुळे पायलट आपल्या राजकीय कारकिर्दीचे विमान कोणत्या दिशेने उडवणार याबाबत बरीच उत्सुकता आहे. दरम्यान, काँग्रेसमधून हकालपट्टी झाल्यावर पायलट यांनी 'सत्याला त्रास देता येऊ शकतो.. पराभूत नाही ' असे ट्विट केले आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jul 14, 2020 03:03 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).