Rahul Gandhi यांनी अविश्वास प्रस्तावावर पहिल्यांदा बोलणे टाळले, कारण..

No-Confidence Motion: मणिपूर हिंसाचार मुद्द्यावर विरोधकांकडून दाखल अविश्वास प्रस्तावावर राहुल गांधी यांनी प्रथम भाषण करणे टाळले. त्याची विविध कारणे चर्चीली जात आहेत.

Rahul Gandhi | (Photo Credits: You Tube)

Rahul Gandhi On No-Confidence Motion: मणिपूर हिंसाचार (Manipur Violence Case) मुद्द्यावरुन विरोधकांच्या INDIA आघडीने संसदेत आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरु झाली आहे. काल चर्चेचा पहिला दिवस होता. प्रस्तावावर काँग्रेस नेते राहुल गांधी पहिले भाषण करतील अशी अटकळ होती. मात्र, काँग्रेसचे उपनेते गौरव गोगोई यांनी प्रस्ताव मांडला. चर्चेचा पहिला दिवस काल पूर्ण झाला. आज दुसरा दिवस आहे. पहिल्या दिवशी राहुल यांनी भाषण केले नाही. त्यामुळे आज तरी राहुल गांधी या प्रस्तावावर बोलणार का? याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता कायम आहे.

भाजप नेत्यांमध्येही राहुल गांधी यांच्या भाषणाची उत्सुकता

विरोधकांनी दाखल केलेल्या अविश्वास प्रस्तावावर राहुल गांधी काय बोलतात यावर विरोधकांमध्येही उत्सुकता आहे. गौरव गोगोई यांनी  अविश्वास प्रस्ताव मांडत बोलण्यास सुरुवात केली असता संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी या मुद्द्यावर राहुल यांनी बोलावे अशी मागणी केली. आम्ही त्यांचे भाषण ऐकण्यासाठी आलो आहोत, असेही ते म्हणाले. लोकसभा अध्यक्षांच्या दालनात झालेल्या चर्चेचा दाखला देत त्यांनी हे विधान केले.

गौरव गोगोई यांचा भाजप नेत्यांना सवाल

प्रल्हाद जोशी यांनी केलेल्या विधानावर आक्षेप घेत गौरव गोगोई यांनी अध्यक्षांच्या दालनात झालेल्या चर्चेचा तपशील तेवढ्यापूरता मर्यादीत असतो. तो तेथेच राहतो. ठेवायचा असतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दालनात झालेल्या चर्चेचा दाखला देऊन बोलले तर भाजपला चालेल का? असा सवाल गोगोई यांनी उपस्थित केला. केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत गोगोई यांनी हा प्रश्न विचारल्यामुळे भाजप खासदार आक्रमक झाले. दरम्यान, खासदारांच्या या गोंधळातच गोगोई यांनी आपले भाषण सुरु केले.

राहुल गांधी यांनी पहिल्या दिवशी बोलणे टाळण्याची संभाव्य कारणे

  • अविश्वास प्रस्तावावर चर्चेस राहुल गांधी आपल्या भाषणाने सुरुवात करतील असे अपेक्षीत असताना काँग्रेसने गौरव गोगोई यांना भाषण करण्यास सांगण्याची खेळी खेळली. असे का केले असावे या प्रश्नाची दोन कारणे बोलली जात आहेत.
  • पहिले म्हणजे गोगोई हे ईशान्येकडील प्रदेशातील खासदार आहेत. त्यांनी मणिपूरच्या मुद्द्यावर अविश्वास प्रस्तावावरील चर्चेला सुरुवात करणे हे प्रतीकात्मकदृष्ट्या महत्त्वाचे होते.
  • दुसरे म्हणजे राहुल गांधी यांना खासदारकी नुकतीच पुन्हा बहाल झाली आहे. अशा वेळी त्यांनी सुरुवात केली असती तर त्यांच्यावर सत्ताधाऱ्यांकडून प्रचंड टीका झाली असती आणि मूळ मुद्द्याला बगल मिळाली असती. त्यातच त्यांच्यावर घराणेशाहीचाही आरोप झाला असता.
  • तिसरे असे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी सभागृहात उपस्थित नव्हते. पंतप्रधान जेव्हा सभागृहात उपस्थित असतील तेव्हा बोलल्यास त्याचा अधिक परीणाम पाहायला मिळू शकतो. इतकेच नव्हे तर प्रसारमाध्यमांचा प्रकाशझोत एकट्या नरेंद्र मोदी यांच्यावर न राहता तो विभागला जाईल.

दरम्यान, आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे देखील सभागृहात बोलण्याची शक्यता आहे. शिवाय आज चर्चेचा शेवटचा दिवस असल्याने राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील सभागृहात मणिपूर मुद्दा आणि अविश्वास प्रस्ताव यावर बोलण्याची शक्यता आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement