Pune MHADA: पुणे म्हाडाच्या घरांची सोडत लांबणीवर, आचारसंहितेमुळे २८ मे चा कार्यक्रम रद्द, जाणून घ्या कारण
पुणे म्हाडा अंतर्गत घर मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी मोठी अपडेट समोर आली आहे. विधान परिषद निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे २८ मे रोजी होणारी म्हाडाच्या घरांची सोडत तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे.
पुणे म्हाडाच्या घरांची प्रतीक्षा करणाऱ्या नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळामार्फत राबवल्या जाणाऱ्या सदनिका वितरण प्रक्रियेला सध्या प्रशासकीय पातळीवर तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. २८ मे रोजी होणारा घरांच्या वितरणाचा नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आला असून, यामुळे हक्काच्या घराची चावी हातात पडण्याची वाट पाहणाऱ्या अर्जदारांची प्रतीक्षा आणखी वाढली आहे.
म्हाडाच्या पुणे मंडळाकडून पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीए (PMRDA) क्षेत्रातील विविध गृहनिर्माण योजनांमधील रिक्त घरांसाठी ही सोडत काढली जाणार होती. यामध्ये २० टक्के सर्वसमावेशक योजना आणि १५ टक्के सामाजिक गृहनिर्माण योजनेतील घरांचा समावेश होता.
२८ मे रोजी दुपारी २:३० वाजता 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' या तत्त्वावर ही वितरण प्रक्रिया पार पडणार होती. मात्र, भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणुकांमुळे पुण्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणूक काळात सरकारी योजनांचे लाभ किंवा घरांचे वाटप करण्यावर निर्बंध असल्याने म्हाडा प्रशासनाला हा कार्यक्रम पुढे ढलावा लागला आहे.
विधान परिषद निवडणुकीचे वेळापत्रक
म्हाडाच्या गृहनिर्माण सोडतीवर परिणाम करणाऱ्या विधान परिषद निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. या निवडणुकीचे महत्त्वाचे टप्पे पुढीलप्रमाणे पार पडणार आहेत.
२५ मे रोजी या निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध झाली असून, १ जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. त्यानंतर २ जून रोजी अर्जांची छाननी होईल आणि ४ जून ही अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असेल. १८ जून रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडेल, तर २२ जून रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केले जातील. २५ जून रोजी ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणार आहे.
सुधारित कार्यक्रम लवकरच जाहीर होणार
निवडणूक आयोगाच्या नियमानुसार, संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये किमान ७५ टक्के मतदार असणे अनिवार्य असते. ही अट पूर्ण झाल्यानंतर आता ही निवडणूक घेतली जात आहे.
या निवडणुकांची प्रक्रिया आणि आचारसंहिता पूर्ण संपल्यानंतरच म्हाडाच्या घरांच्या वितरणाला पुन्हा सुरुवात होणार आहे. म्हाडा प्रशासनाकडून लवकरच या सदनिका वितरणाचा नवीन आणि सुधारित कार्यक्रम अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केला जाईल. तोपर्यंत अर्जदारांनी म्हाडाच्या अधिकृत सूचनांकडे लक्ष ठेवावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.