PM Narendra Modi यांच्या काकी नर्मदाबेन मोदी यांचे Covid-19 संसर्गामुळे निधन
त्यांना कोविड-19 चा संसर्ग झाल्याने त्यांच्यावर अहमदाबाद येथील रुग्णालयात उपचार सुरु होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या काकी नर्मदाबेन मोदी (Narmadaben Modi) यांचे निधन झाले आहे. त्यांना कोविड-19 (Covid-19) चा संसर्ग झाल्याने त्यांच्यावर अहमदाबाद (Ahmedabad) येथील रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र आज (मंगळवार, 27 एप्रिल) त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या 80 वर्षांच्या होत्या. अहमदाबाद शहरातील न्यू राणीप (New Ranip) परिसरात त्या आपल्या कुटुंबियांसमवेत राहत होत्या.
"आमच्या काकी नर्मदाबेन मोदी यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांना 10 दिवसांपूर्वी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र आज त्यांचे निधन झाले," अशी माहिती पंतप्रधान मोंदी यांचे लहान प्रल्हाद मोदी यांनी दिली आहे.
PTI Tweet:
नर्मदाबेन मोदी यांचे पती जगजीवनदास मोदी यांचे काही वर्षांपूर्वीच निधन झाले होते. त्यामुळे नर्मदाबेन मोदी या आपल्या मुलांसोबत राहत होत्या. जगजीवनदास हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वडील दामोदरदास यांचे बंधू होते. त्यामुळे नर्मदाबेन मोदी या नात्याने पंतप्रधान मोदी यांच्या काकी लागत होत्या.
दरम्यान, देशात कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. दिवसागणित रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून मृतांचा आकडाही चिंताजनक आहे. आज देशात 3,23,144 नव्या रुग्णांची भर पडली असून 2771 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या 28,82,204 अॅक्टीव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत.