पंतप्रधान नरेंद्र मोदी महिलांसाठी सोडणार सोशल मीडिया अकाउंटचा ताबा; ट्विट वरून सांगितले 'हे' खास कारण
या दिवशी प्रेरणादायी महिलांना आपल्या संघर्ष कथा मोदींच्या अकाउंंट वरुन शेअर करता येणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी काल, 2 मार्च रोजी रात्री अचानक आपण सोशल मीडियापासून दूर जात असल्याचे सांगत एक अनपेक्षित ट्विट केले होते, यावरून मागील काही तासात अनेक ठिकाणी चर्चांना उधाण आलेले आपण पाहिले.मात्र आता या चर्चांवर मोदींनी स्वतः स्पष्टीकरण दिले आहे, येत्या रविवारी म्हणजेच 8 मार्च रोजी असणाऱ्या महिला दिनाच्या (Women's Day) निमित्ताने केवळ एका दिवसासाठी मोदी आपल्या सोशल मीडिया अकाउंटचा ताबा काही खास व्यक्तींसाठी सोडणार आहेत या व्यक्ती असणार आहेत काही प्रेरणादायी महिला.आपल्या जीवनातील प्रेरणादायी प्रवास थेट मोदींच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर करण्याची संधी महिलांना मिळणार आहे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत या महिलांचा संघर्ष पोहचावा याकरिता हा अनोखा उपक्रम राबवण्यात येणार असल्याचे मोदी यांनी ट्विट मध्ये लिहिले आहे.
नरेंद्र मोदी यांच्या ट्विटनुसार, महिला दिनाच्या निमित्त प्रेरणादायी महिलांचा संघर्ष मोदींच्या युट्युब, इंस्टाग्राम, ट्विटर, फेसबुक वरून जगापर्यंत पोचवला जाणार आहे, यासाठी इच्छुक महिलांनी स्वतःचा किंवा आपल्या ओळखीतील अन्य कोणाचा संघर्षकथा या दिवशी #SheInspiresUs या हॅशटॅगचा वापर करून सोशल मीडियावर पोस्ट करायच्या आहेत. यातील काही निवडक कथा या मोदींच्या अकाऊंटवरून शेअर केल्या जाणार आहेत.
नरेंद्र मोदी ट्विट
दरम्यान, नरेंद्र मोदी सोशल मीडिया सोडण्याच्या चर्चांना सुद्धा या ट्विटमुळे पूर्णविराम मिळाला आहे. वास्तविक मोदी सोशल मीडियावरील ताबा सोडणार हे जरी निश्चित असले तरी हा निर्णय केवळ एका दिवसासाठी घेण्यात आला आहे. येत्या रविवारी म्हणजेच 8 मार्च च्या निमित्त हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.