Jostling In Rajya Sabha Video: राज्यसभा सभागृहात नेमके काय घडले? मार्शल आणि खासदार यांच्यातील गदारोळाचा व्हिडिओ

यात विरोधी पक्षाचे सदस्य मार्शलसोबत संघर्ष करताना दिसत आहेत. साधारण 2.5 मीनिटांचे हे फुटेज आहे.

Jostling In Rajya Sabha Video | (Photo Credits: ANI/Twitter Video)

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात (Parliament Monsoon Session) यंदा गदारोळ आणि असंसदीय प्रकाराचा कळस गाठला गेला. निश्चित दिवसांपैकी एकही दिवस संसदेचे अधिवेशन स्थगित न होता चालले नाही. कामाचे तासचे तास वाया झाले. पेगासस (Pegasus) पाळत प्रकरण, कृषी कायदे, बेरोजगारी आणि महागाई अशा विविध मुद्द्यांवरुन विरोधक सातत्याने आक्रमक राहिले. आवाज उठवत राहिले. परंतू, लोकसभा आणि राज्यसभा (Rajya Sabha) अशा दोन्ही सभागृहात सरकारने कायम ताठर भूमिका कायम ठेवत कामकाज रेटले. बहुमताच्या जोरावर विधेयके मंजूर केली. दरम्यान, विमा सुधारणा विधेयक मंजूरी वेळी राज्यसभेत मार्शल (Marshall) पाचारण करण्यात आले. या वेळी मार्शल आणि विरोधी पक्षांचे खासदार यांच्यात धक्काबुक्की आणि झटापटही झाल्याचे आरोप प्रत्यारोप झाले. दरम्यान, राज्यसभेतील या गदारोळाबाबतचा एक सीसीटीव्ही (Rajya Sabha CCTV) व्हिडिओ जारी करण्यात आला आहे. यात विरोधी पक्षाचे सदस्य मार्शलसोबत संघर्ष करताना दिसत आहेत. साधारण 2.5 मीनिटांचे हे फुटेज आहे.

गदारोळामुळे संसदेचे कामकाज निश्चित काळाच्या पूर्वीच अचानक स्थगित करण्यात आले. हे कामकाज स्थगित होण्यापूर्वी जो गदारोळ झाला. त्याचा एकअडिच मिनिटांचा हा व्हिडिओ जारी झाला आहे. यात विरोधी पक्षांचे खासदार सभागृहात घोषणा देताना दिसत आहेत. तर संसदेच्या सुरक्षेची जबाबदारी असलेले मार्शल या खासदारांना रोकताना पाहायला मिळथ आहे. विरोधक कागदांचे कपटे फेकताना दिसत आहेत. एक खासदार टेबलावर चढताना दिसतो. जेव्हापासून हा व्हिडिओ पुढे आला तेव्हापासून विरोधकांनी पावसाळी अधिवेशन लवकर संपल्याबद्दल आणि खासदारांसोबत कथीत गैरवर्तन केल्याबद्दल आपला आवाज अधिक तीव्र केला आहे.

राज्यसभेतील गदारोळानंतर काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि इतरही अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांनी संसदेबाहेर एकत्र येत मोर्चा आयोजित केला. तसेच, राज्यसभा सभापती व्यंकय्या नायडू यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे म्हटले. असाही आरोप करण्यात आला आहे की, मार्शलच्या वेशामध्ये आलेले लोक हे मार्शल नव्हते तर खासदारांसोबत धक्काबुक्की आणि गैरवर्तन करण्यासाठी त्यांना बाहेरुन बोलावण्यात आले होते. (हेही वाचा, Parliament Monsoon Session: महिला, पुरुष खासदारांना धक्काबुक्कीसाठी बाहेरुन लोक राज्यसभेत आणले; काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा गंभीर आरोप)

दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे की, संसदेमध्ये विरोधी पक्षांना आपले म्हणने मांडण्याची संधी दिली नाही. बुधवारी महिलांबाबत जी घटना घडली ती लोकशाहीच्या विरोधात आहे. असे वाटते आहे की, आम्ही पाकिस्तानी सीमेवर उभे आहोत. त्या आधी बुधवारी राज्यसभेत विरोधी खासदारांनी विमा सुधारणा बिल सादर करत असताना केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. संजय राऊत यांनी राज्यसभेतील एक फोटो ट्विट करत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. यात 'ही आपली संसदीय लोकशाही आहे का?' असा सवाल उपस्थित करत 'लोकशाहीच्या मंदिरात मार्शल कायदा', अशी टीका केली आहे.

एएनआय व्हिडिओ

केंद्र सरकारने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. विरोधकांच्या हल्ल्याचा प्रतिवाद करण्यासाठी केंद्र सरकारने आपल्या ज्येष्ठ आणि बड्या मंत्र्यांना मैदानात उतरवले आहे. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटले की, विरोधकांकडून लावण्यात आलेले सर्व आरोप पूर्णपणे खोटे आहेत. सीसीटीव्ही फुटेजमध्ये वास्तव काय आहे ते पुढे आले आहे.