भारतातून फरार झालेल्या नित्यानंद बाबाने केली Reserve Bank of Kailasa ची स्थापना; गणेश चतुर्थीच्या दिवशी बाजारात घेऊन येणार नवे चलन
आपल्या नवीन देशासाठी त्याने नवीन ध्वज, नवीन राज्यघटना आणि नवीन प्रतीक देखील निश्चित केले आहे.
डिसेंबर 2019 मध्ये बातमी आली होती की, स्वयंभू बाबा नित्यानंद (Nithyananda) याने आपला कैलास (Kailaasa) नावाचा स्वतःचा नवीन देश स्थापन केला आहे. आपल्या नवीन देशासाठी त्याने नवीन ध्वज, नवीन राज्यघटना आणि नवीन प्रतीक देखील निश्चित केले आहे. आता माहिती मिळत आहे की, नित्यानंदने सांगितले आहे की, देश 'कैलास' मध्ये ‘रिझर्व्ह बँक ऑफ कैलास’ (Reserve Bank of Kailasa) स्थापन केली जाणार आहे. यासाठी, विशेष चलन व्यवहारात आणण्याव्यतिरिक्त ते इतरत्र वैध ठरावे यासाठी, विविध देशांशी काही करार झाले आहेत. गणेश चतुर्थीनिमित्त 22 ऑगस्ट रोजी हिंदू रिझर्व्ह बँकेची स्थापना करून, त्याच दिवशी नवीन चलन बाजारात आणले जाणार आहे.
त्यासंदर्भात सर्व कायदेशीर बाबी पूर्ण झाल्या असून, धोरणात्मक कागदपत्रे तयार केली गेली आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली. स्वामी नित्यानंद म्हणाला की, या संदर्भात अनेक देशांशी करार झाले आहेत आणि जगभरातील देणग्या म्हणून मिळालेली रक्कम ही निर्मिती आणि व्यवहार करण्यासाठी वापरली जाईल. या घोषणेनंतर, नित्यानंद याची छायाचित्रे असलेल्या नोटा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
दरम्यान, कर्नाटक आणि गुजरातमध्ये आश्रमांची उभारणी करून अध्यात्माच्या नावाखाली महिलांचा लैंगिक छळ करणाऱ्या नित्यानंद स्वामीने, बलात्काराच्या घटनेपासून स्वत: ला वाचवण्यासाठी पासपोर्टविना भारतामधून पळ काढला होता. नंतर नित्यानंद स्वामीने आपल्या संकेतस्थळाद्वारे इक्वाडोरहून एक छोटेसे बेट खरेदी करून, स्वतःचा नवा देश ‘कैलास’ स्थापन केल्याची घोषणा केली. त्यासाठी पासपोर्ट, ध्वज आणि राष्ट्रीय चिन्ह डिझाइन केले गेले आहे. वेबसाइटनुसार, फरार स्वयंभू बाबा नित्यानंद याने 'हिंदू सार्वभौम राष्ट्रा’ची घोषणा केली आहे. इतकेच नाही तर, त्याच्याकडे तथाकथित ‘कैलास; देशाचे पंतप्रधान आणि मंत्रिमंडळही आहे. (हेही वाचा: नित्यानंद बाबाने स्थापन केला नवा देश 'कैलास'; मंत्रिमंडळ, झेंडा, पासपोर्ट असा असेल थाट)
वेबसाइटमध्ये म्हटले आहे की, नागरिकांना कैलासचा स्वतंत्र पासपोर्ट देण्यात येईल, आणि परमशिवाच्या आशीर्वादाने पासपोर्टधारक कैलाससह इतर 11 दिशेतील 14 देशांत जगात प्रवेश करू शकतात.