Nitish Kumars: आता पुन्हा इथं-तिथं जाण्याचा प्रश्नच येत नाही, मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर नितीश कुमारांची पहिली प्रतिक्रिया
म्हणजे, मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन पुन्हा त्याच दिवशी मुख्यमंत्री पदाची शपथही घेण्याचा विक्रम नितीश कुमारांनी केला.
बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमारांनी (CM Nitish Kumars) राजद-काँग्रेससह असलेल्या आघाडीतून बाहेर पडत सरकार पाडले. मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन त्यांनी एनडीएसह (NDA)सत्तास्थापनेचा दावा केला. भाजपाच्या (BJP)पाठिंब्याचे पत्र राज्यपालांनी स्वीकारलं असून नितीश कुमारांनी आज 28 जानेवारी रोजी नवव्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. म्हणजे, मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन पुन्हा त्याच दिवशी मुख्यमंत्री पदाची शपथही घेण्याचा विक्रम नितीश कुमारांनी केला.
नितीश कुमारांचा शपथविधी कार्यक्रम झाल्यानंतर माध्यमांनी त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांची थोडक्यात भूमिका स्पष्ट केली. “मी सुरुवातीपासून एनडीएबरोबर होतो. पण आम्ही आमचे मार्ग बदलले. परंतु, आता पुन्हा एकदा आम्ही एकत्र आलो असून यापुढेही एकत्रच राहणार आहोत”, असं नितीश कुमार म्हणाले. “आम्ही बिहारच्या विकासासाठी एकत्र आलो आहोत. मी जिथं होतो तिथंच (NDA) परत आलो आहे. आता पुन्हा इथं-तिथं जाण्याचा प्रश्नच येत नाही”, असंही ते पुढे म्हणाले.
पाहा पोस्ट -
आज विधिमंडळात नितीश कुमारांनी राजद-काँग्रेस सरकारच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली. त्यानंतर, त्यांनी राज्यापालांकडे जात राजीनामा सुपूर्द केला. राजीनामा दिल्यानंतर भाजपाच्या आमदारांनी त्यांना पाठिंबा जाहीर केला. भाजपाच्या पाठिंब्याचं पत्र राज्यपालांना देत त्यांनी एनडीएकडून सरकार स्थापनेचा प्रस्ताव ठेवला.