Nirbhaya Gang-Rape & Murder Case: चार गुन्हेगारांना फाशी देत जल्लाद पवन आपल्या आजोबांचा विक्रम मोडणार; दोषी विनय शर्मा, मुकेश सिंह यांची 'क्यूरेटिव पिटीशन' न्यायालयाने फेटाळली

दरम्यान, दोषींपैकी दोघे विनय शर्मा आणि मुकेश सिंह यांनी क्यूरेटिव पिटीशन दाखल केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या पाच दसस्यीय खंडपीठाने एकमताने ही पिटीशन फेटाळून लावली

Nirbhaya Gang-Rape Murder Case | (Photo Credit: Archived, edited, representative images)

Nirbhaya Gang-Rape & Murder Case: उत्तर प्रदेश राज्यातील जल्लाद पवन (Pawan Jallad) निर्भया सामूहिक बलात्कार, हत्या प्रकरणातील 4 गुन्हेगारांना फाशी देणार आहेत. विशेष म्हणजे या गुन्हेगारांना फाशी दिल्यावर जल्लाद पवन यांच्याकडून आपल्याच आजोबाचा म्हणजेच जल्लाद लक्ष्मण (Laxman Jallad) यांचा विक्रम मोडणार आहे. 1950-60 च्या दशकात पवन यांचे आजोबा देशातील विविध न्यायालयांनी सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करुन गुन्हेगारांना फासावर चढवण्याचे काम करत असत. आता पवन यांच्या रुपात त्यांचा नातू हे काम करण्याच्या तयारीला लागला आहे. मेरठ (Meerut) येथील पवन याच्या कुटुंबीयांमध्ये गेले चार पिढ्यांपासून जल्लाद म्हणून गुन्हेगारांना फाशी देण्याचे काम करत आले आहेत. प्रसारमाध्यमांशी बोलताना पवन सांगतात की, माझ्या आजवरच्या आयुष्यात मी पहिल्यांदाच एकाच वेळी 4 गुन्हेगारांना फाशी देणार आहे.

दरम्यान, निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणात एकूण 6 आरोपी होते. त्यापैकी एकाने कारागृहातच आत्महत्या केली. दुसरा अल्पवयीन असल्याने त्याला सुधारगृहात ठेवले आहे. इतर 4 जणांना फाशिची शिक्षा ठोठावली आहे. दिल्ली येथील पटियाला कोर्टाने हा निर्णय दिला. दरम्यान, दोषींपैकी दोघे विनय शर्मा आणि मुकेश सिंह यांनी क्यूरेटिव पिटीशन दाखल केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या पाच दसस्यीय खंडपीठाने एकमताने ही पिटीशन फेटाळून लावली. त्या आधी पटियाला हाऊस कोर्टाने गेल्याच आठवड्यात दोषी अक्षय ठाकुर (31), पवन गुप्ता (25), मुकेश सिंह (32) और विनय शर्मा (26) यांना डेथ वॉरंट जारी केले होते. न्यायालयाने म्हटले होते की, चारही आरोपींना 22 जानेवारी 2020 या दिवशी फाशी दिली जावी. त्यासाठी सकाळी 7 ही वेळही न्यायालयाने निश्चित करुन दिली आहे. (हेही वाचा, Nirbhaya Gang-Rape & Murder Case: निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा घटनाक्रम 2012 ते 2020; ठळक घडामोडींवर एक नजर)

या प्रकरणातील चारही आरोपींच्या फाशीसाठी तिहार कारागृहात फाशिची तयारी पूर्ण केरण्यात आली आहे. रविवारी डमी आरोपींना फाशी देण्यात आली होती. ही प्रक्रिया मुख्य आरोपीला फशी देण्यापूर्वीची तालीम म्हणून पार पाडली जाते. त्यासाठी मूळ आरोपीच्या वजनाइतका दगड आणि माती यांद्वारे एक डमी आरोपी तयार केला जातो. मात्र, डमी गुन्हेगाराला फाशी देण्यासाठी जल्लादला बोलविण्यात आले नव्हते. कारगृह अधिकारी आणि कारागृहातील इतर अधिकाऱ्यांनीच ही प्रक्रिया पार पाडल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे.

दरम्यान, प्रसारमाध्यमांनी वृत्त दिले आहे की, चारही दोषींना कारागृह क्रमांक 3 मध्ये फाशी दिले जाईल. तीन दोषींना कारागृह क्रमांक 2 मध्ये ठेवण्यात आले आहे. तर, एकाला कारागृह क्रमांक 4 मध्ये ठेवण्यात येईल. निर्भया प्रकरणात तब्बल 2578 दिवसांनंतर आरोपींना डेथ वॉरंट काढण्यात आले होते. निर्भयावर सामूहिक बलात्कार आणि हत्येची घटना 16 डिसेंबर 2012 मध्ये घडली होती. त्यानंतर 9 महिन्यांनी म्हणजेच सप्टेंबर 2013 मध्ये कनिष्ट न्यायालयाने दोषींना फाशीची शिक्षा ठोठावली होती. मार्च 2014 मध्ये उच्च न्यायालयाने आणि मे 2017 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने आरोपींची फाशीची शिक्षा कायम ठेवली होती.