Nihang Sikhs Attack Shiv Sena Leader: शिवसेना नेते संदीप थापर यांच्यावर निहंग शिखांचा हल्ला, दोघांना अटक; लुधियाना येथील घटना

लुधियाना (Ludhiana) शहरातील वर्दळीच्या ठिकाणी रस्त्यावर ही घटना शुक्रवारी (5 जुलै) घडली. निहंग शिख (Nihang Attack) समुहातील तिघांच्या एका गटाने केल्याची माहिती आहे.

Sandeep Thapar | (Representational Purpose | Photo Credits: Pixabay.com)

पंजाबमधील शिवसेना (Shiv Sena) नेते संदीप थापर (Sandeep Thapar) ( वय-58 वर्षे) यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. लुधियाना (Ludhiana) शहरातील वर्दळीच्या ठिकाणी रस्त्यावर ही घटना शुक्रवारी (5 जुलै) घडली. निहंग शिख (Nihang Attack) समुहातील तिघांच्या एका गटाने केल्याची माहिती आहे. हल्ल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हल्ला करणाऱ्या तिन्ही संशयितांची ओळख पटली असून त्यापैकी दोघांना अटक करण्यात आली आहे. संवेदना या एनजीओ ट्रस्टचे संस्थापक-अध्यक्ष आणि भाजप नेते रविंदर अरोरा यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर सदर संस्थेच्या कार्यालयातून परतत असताना सिव्हिल हॉस्पिटलजवळ हा हल्ला झाला.

घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

सीसीटीव्ही फुटेज आणि लुधियानाच्या रस्त्यावरील नागरिकांनी रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओंमध्ये दुचाकीवरुन निघालेल्या थापर यांच्या दिशेने येणारे निहंग स्पष्ट दिसतात. ते जवळ येताच त्यांना पाहून थापर थांबले आणि हात जोडून बोलत असतानाच एका हल्लेखोराने त्यांच्यावर तलवारीने हल्ला केला. फुटेजमध्ये, दुसरा हल्लेखोर थापर यांच्या बंदूकधारी सुरक्षारक्षकाला ढकलून देताना दिसत आहे. त्यांच्यावर तलवारीने अनेक वार केल्यानंतर, दोन हल्लेखोर थापर यांची दुचाकी घेऊन पळून गेले आणि थापर रक्ताच्या थारोळ्यात पडले. (हेही वाचा, Animal Cruelty in Punjab: कारचे कव्हर फाडल्यावरुन कुत्र्याची भोसकून हत्या, पंजाबमधील घटना)

सुरक्षा रक्षलाला बाजूला ढकलून हल्ला

शिवसेना (पंजाब) प्रमुख राजीव टंडन यांच्या म्हणण्यानुसार, थापर त्याच्या दुचाकीवर निघाले होते. या वेळी त्यांच्यावर हल्ला झाला. थापर याना प्रधान करण्यात आलेली सुरक्षा काही दिवसांपूर्वीच कमी करण्यात आली होती. त्यानंतर पुढच्या काहीच काळात हा हल्ला झाला आहे. त्यामुळे त्यांची सुरक्षा कमी केल्यानेच हा हल्ला झाल्याचा आरोप टंडण यांनी केला आहे. दरम्यान, एएसआय सुखवंत सिंग, थापर यांच्यासोबत असलेला बंदूकधारी, रक्तस्त्राव झालेल्या थापरला दयानंद वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात (डीएमसीएच) घेऊन गेला. त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरु आहेत, मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. हल्ल्याचे ठिकाण सिव्हिल हॉस्पिटल पोलिस चौकी आणि विभाग क्रमांक 2 पोलिस स्टेशनपासून अवघ्या काही मीटर अंतरावर आहे. (हेही वाचा, Sanjay Nirupam Rejoins Shiv Sena: कॉंग्रेस ला राम राम ठोकलेल्या संजय निरूपम यांचा आज पत्नी, मुलीसह पुन्हा शिवसेना पक्षात प्रवेश)

भारतीय न्याय संहितेच्या कलमांखाली गुन्हा दाखल

ASI सुखवंत सिंग यांच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम 109, 3(5), 115(2), 304 आणि 132 अंतर्गत खुनाचा प्रयत्न आणि इतर गुन्ह्यांसाठी एफआयआर नोंदवण्यात आला. एएसआयने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, तलवारी घेऊन आलेल्या तीन अमृतधारी (Amritdhari) शिखांनी थापर यांच्या दुचाकीला घेराव घातला. त्याने पुढे सांगितले की, तो वाहनावरुन खाली उतरताच, आरोपींपैकी एकाने त्याचे सर्व्हिस रिव्हॉल्व्हर हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला आणि तिघांनीही थापरवर हल्ला करण्यापूर्वी त्याला बाजूला ढकलले, त्याच्या डोक्याला, हाताला आणि पायांना दुखापत झाली.

लुधियानाचे पोलीस आयुक्त कुलदीप सिंग चहल आणि फतेहगढ साहिबचे एसएसपी रवज्योत कौर ग्रेवाल यांनी संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधित करताना सांगितले की, हल्लेखोरांची नावे सरबजीत सिंग साबा (34, रा. टिब्बा रोड), हरजोत सिंग उर्फ ​​जोटा भामियान (30) , दोघेही लुधियाना येथील आहेत आणि तिसरा हल्लेखोर अमृतसरचा असून त्याचे नाव तहलसिंग लाडी असे आहे. ते सध्या ट्रान्सपोर्ट नगरजवळील शिवशक्ती कॉलनीतील निहंग शीख छावनी येथे राहत होते. पोलिसांच्या पथकाने पाठलाग करून सरबजीत आणि हरजोत यांना फतेहगढ साहिब येथून अटक केली आणि थापरची दुचाकी जप्त केली. चहल यांनी सांगितले की, थापर यांच्यासोबत असलेल्या ऑन-ड्युटी बंदूकधारीविरुद्ध चौकशी सुरू करण्यात आली असून, त्याला लवकरच निलंबित केले जाईल. तीनही हल्लेखोर निहंग सिंग असल्याची पुष्टी डिव्हिजन क्रमांक 2 पोलिस स्टेशनचे एसएचओ इन्स्पेक्टर गुरजीत सिंग यांनी केली.