उत्तर प्रदेशमध्ये ISISचा नवा चेहरा उघडकीस?; RSSचे कार्यालय होते निशाण्यावर
जगभरातील विविध देशांमध्ये काही टोळ्यांच्या माध्यमातून ही संघटना अद्यापही कार्यरत असल्याचे NIAच्या कारवाईतून पुढे येत आहे.
राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थातच NIAने दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये 16 ठिकाणी छापे टाकले. या कारवाईतून आयएसआयएस (ISIS) (इस्लामिक स्टेट) ही दहशतवादी संघटना आता भारतातही हातपाय पसरत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे. आयएसआयएसचे सिरीयातून समूळ उच्चाटन झाल्याचा दावा नेहमीच केला जात असतो. जगभरातील विविध देशांमध्ये काही टोळ्यांच्या माध्यमातून ही संघटना अद्यापही कार्यरत असल्याचे NIAच्या कारवाईतून पुढे येत आहे. प्राप्त माहितीनुसार, एनआयएने राजधानी दिल्लीत जाफराबाद, सीलमपुर या ठिकाणी तर, उत्तर प्रदेशमध्ये अमरोहा परिसरातील काही ठिकाणी छापे टाकले. एनआयए आणि उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाने संयुक्तपणे ही कारवाई केली.
सूत्रांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलीस मुख्यालय, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यालय यांच्यासह अनेक मोठ्या ठिकाणी दहशतवादी हल्ला करण्याची आयसीस (ISIS)चा कट होता. अमरोहा येथून पकडण्यात आलेला सुहैल हा या गटाचा म्होरक्या होता. (हेही वाचा, मुस्लिम ब्रदरहूड: विचार, कार्य आणि दहशतवाद)
एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, ISISचे भारतील हा नवा चेहरा पुढे आला आहे. आयएसआयएसचा हा भारतातील गट 'हरकत उल हर्ब ए इस्लाम' (Harkat ul harb e islam)नावाने कार्यरत होता. एनआयए या गटाशी संबंधीत ठिकाणांचा तपास करत आहे. या प्रकरणात अमरोहा येथून 5 संशयीतांना जणांना ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्या एकूण संशयीतांची संख्या 10 इतकी आहे. दुपारी 4 वाजता एनआयए या प्रकरणी पत्रकार परिषद घेणार आहे.