Independence Day 2026: स्वातंत्र्यानंतर प्रथमच लाल किल्ल्याच्या प्रांगणातून राष्ट्रीय गीत 'वंदे मातरम' सादर (Watch Video)
भारताने आज, १५ ऑगस्ट २०२६ रोजी आपला ८०वा स्वातंत्र्य दिन साजरा केला. यंदा प्रथमच 'वंदे मातरम' लाल किल्ल्यावरील सोहळ्यात सादर करण्यात आले.
80th Independence Day: भारताने आज आपला ८०वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून सलग तेराव्यांदा राष्ट्रध्वज फडकावला आणि देशवासीयांना संबोधित केले. यावेळी बोलताना त्यांनी गेल्या बारा वर्षांत देशातील सुमारे पंचवीस कोटी नागरिक गरिबीतून बाहेर आल्याचा दावा केला. यंदाच्या विशेष आकर्षण ठरलं ते राष्ट्रीय गीत 'वंदे मातरम'. यंदा प्रथमच स्वातंत्र्यानंतर 'वंदे मातरम' (Vande Mataram) लाल किल्ल्यावरील सोहळ्यात सादर करण्यात आले. PM Modi Independence Day 2026 Speech Live Streaming: पीएम मोदींनी लाल किल्ल्यावर फडकावला तिरंगा; इथे थेट पहा भाषण .
प्रथमच 'वंदे मातरम'चे सादरीकरण
यंदाच्या सोहळ्यातील सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे स्वातंत्र्यानंतर प्रथमच राष्ट्रीय गीत 'वंदे मातरम' लाल किल्ल्याच्या प्रांगणातून सादर करण्यात आले. हे गीत राष्ट्रगीताआधी सादर झाले. राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी)च्या विद्यार्थ्यांनी आणि 'माय भारत' उपक्रमातील स्वयंसेवकांनी हे सादरीकरण केले. हा दिवस राष्ट्रीय गीताच्या दीडशेव्या वर्षपूर्तीचे औचित्य साधणारा ठरला.
ध्वजारोहणानंतर भारतीय हवाई दलाच्या दोन एमआय-१७ हेलिकॉप्टरने कार्यक्रमस्थळी पुष्पवृष्टी केली. एका हेलिकॉप्टरने राष्ट्रध्वज तर दुसऱ्याने 'वंदे मातरम' असे लिहिलेला ध्वज घेऊन उड्डाण केले. या हेलिकॉप्टरचे वैमानिक विंग कमांडर रजत आणि स्क्वॉड्रन लीडर अंकित वार्ष्णेय हे होते.
यंदाच्या सोहळ्याची संकल्पना आणि उपस्थिती
यावर्षीच्या सोहळ्याची अधिकृत संकल्पना 'युवाशक्ती फॉर विकसित भारत २०४७' अशी होती, ज्यातून सन २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याच्या ध्येयात युवकांच्या योगदानावर भर देण्यात आला. यंदाच्या सोहळ्याचे समन्वयन भारतीय लष्कराकडे सोपवण्यात आले होते.
सोहळ्याला सुमारे पाच हजार विशेष निमंत्रित उपस्थित होते. यामध्ये महिला उद्योजक, तरुण संशोधक, शेतकरी, विविध सरकारी योजनांचे लाभार्थी, स्वच्छता कर्मचारी, दिल्ली मेट्रोचे कर्मचारी आणि पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत फेरीवाले यांचा समावेश होता. समाजातील विविध घटकांना प्रतिनिधित्व मिळावे, या उद्देशाने पाहुण्यांची यादी तयार करण्यात आली होती.