राष्ट्रीय युद्ध स्मारकावर झळकणार लडाख मधील गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या 20 भारतीय जवानांची नावे
लडाख मधील गलवान खोऱ्यात 15 जून रोजी भारत चीन मध्ये झालेल्या झटापटीत शहीद झालेल्या 20 जवानांचे नाव राष्ट्रीय युद्ध स्मारकावर नोंदवण्यात येणार आहे, अशी माहिती अधिकऱ्यांनी दिली आहे.
लडाख (Ladakh) मधील गलवान खोऱ्यात (Galwan Valley) 15 जून रोजी भारत चीन मध्ये झालेल्या झटापटीत शहीद झालेल्या 20 जवानांची नावे राष्ट्रीय युद्ध स्मारकावर (National War Memorial) नोंदवण्यात येणार आहे, अशी माहिती अधिकऱ्यांनी दिली आहे. गेल्या 5 दशकातील या प्राणघातक झटापटीत 20 भारतीय जवानांना आपले प्राण गमवावे लागले. या चकमकीत शहीद झालेल्या भारतीय सैन्य दलातील 16 बिहार रेजिमेंटचे कमांडिंग ऑफिसर कर्नल बी संतोष बाबू (Colonel B Santosh Babu) यांचाही समावेश होता.
पूर्व लडाख मधील भारतीय सीमेवर दोन देशांमधील सैनिकांमध्ये झालेल्या झटापटीनंतर भारत-चीन सीमेवरील तणाव वाढला होता. यावेळेस चीनकडून करण्यात आलेला हल्ला पूर्व नियोजित होता. गलवान खोऱ्यातील पेट्रोलिंग पॉईंड नंबर 14 जवळ चीन अतिक्रमण करत असल्याचे दिसल्याने भारतीय जवानांनी त्यास विरोध करण्यास सुरुवात केली. त्यानंतर चीनी सैन्याने मोठी दगडं. खिळे मारलेले लाकूड, लोखंडाचे रॉड यांचा वापर करुन भारतीय सैन्यावर भीषण हल्ला केला. या हल्लामध्ये जखमी झालेल्या चीनी जवानांची संख्या चीनकडून सांगण्यात आली नाही. परंतु, अमेरिकन इंटिलिजन्स रिपोर्टनुसार, चीनचे 35 जवान या झटापटीत जखमी झाल्याचे समोर आले.
भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 17 जुलैला पूर्व लडाख मधील लुकुंग फॉरवर्ड पोस्टला भेट देऊन जवानांचे मनोधैर्य वाढवले. त्याचप्रमाणे चीनी सैन्याविरुद्ध शौर्य दाखवणाऱ्या बिहार रेजिमेंटच्या जवानाचे कौतुक देखील केले. गलवान खोऱ्यात प्राण गमावलेल्या भारतीय जवानांनी केवळ भारताच्या सीमेचे रक्षण केले नाही तर 130 कोटी भारतीयांच्या अभिमानाचे रक्षण केले आहे, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले. दरम्यान, गेल्या महिन्यात आर्मीचे चीफ जनरल एम.एम. नरवणे यांनी गलवान खोऱ्यात शौर्यकार्य करणाऱ्या 5 जवानांना कमेंडेशन कार्ड्स गौरविले आहे.