Mumbai Metro 3: मुंबईकरांना दिलासा! बीकेसी आणि कफ परेड दरम्यान Aqua Line चा दुसरा टप्पा मे 2025 पर्यंत सुरू होणार
मेट्रो 3 हा 33.5-किमी-लांब असलेला भूमिगत कॉरिडॉर, कुलाबा ते सिप्झ (SEEPZ) पर्यंत धावतो.
Mumbai Metro 3: मुंबई मेट्रोने (Mumbai Metro) प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक दिलासादायक बाब आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (MMRCL) मे 2025 पर्यंत वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) आणि कफ परेड दरम्यान मेट्रो 3 एक्वा लाइनच्या दुसऱ्या टप्प्याचे (Mumbai Metro 3 Phase II Aqua Line) काम सुरू करण्याची योजना आखत आहे. या रेल्वे लाईनचा पहिला टप्पा- आरे कॉलनी ते बीकेसीला जोडणारा, 7 ऑक्टोबर रोजी सुरु करण्यात आला होता. एमआरसीएलच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, दुसऱ्या टप्प्याचे काम 90% पेक्षा जास्त पूर्ण झाले आहे, फक्त काही स्थानके जसे की गिरगाव आणि वरळीतील आचार्य अत्रे चौक, या ठिकाणी विविध स्थानिक समस्यांमुळे लक्ष देणे आवश्यक आहे.
सुरुवातीला मार्च 2025 पर्यंत या मार्गाचे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले गेले, अतिरिक्त चाचणी आवश्यकतांमुळे हा प्रकल्प मे पर्यंत वाढू शकतो. मेट्रो 3 हा 33.5-किमी-लांब असलेला भूमिगत कॉरिडॉर, कुलाबा ते सिप्झ (SEEPZ) पर्यंत धावतो. यामध्ये एकूण 27 स्थानके आहेत, त्यापैकी 26 भूमिगत आहेत.
कनेक्टिव्हिटी सुधारण्याच्या प्रयत्नात, एमएमआरसीएलने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (CSMIA) च्या टर्मिनल 2 (T2) आणि टर्मिनलच्या बाहेर स्थित मेट्रो 3 भूमिगत स्टेशन दरम्यान तात्पुरता वॉकवे बांधण्याची योजना जाहीर केली आहे. सध्या, विमानतळ ते गुंदवलीशी जोडण्यासाठी मेट्रो 7ए स्थानकाचे बांधकाम सुरू असल्याने, प्रवाशांना टर्मिनलवर जाण्यासाठी मेट्रो स्थानकापासून 15 मिनिटांचा वळसा घालून जावे लागते. नगर विकास विभागाचे प्रधान सचिव असीम कुमार गुप्ता यांनी सर्व संबंधित एजन्सींना मेट्रो 3 स्टेशन आणि T2 दरम्यान अखंड कनेक्टिव्हिटी सुनिश्चित करण्यासाठी तात्पुरता वॉकवे तयार करण्याचे निर्देश दिले.
एमएमआरसीएलच्या एका अधिकाऱ्याने पुष्टी केली की, एमएमआरडीएला मेट्रो 7A भूमिगत स्टेशनवर तात्पुरता स्टील पूल-कम-वॉकवे बांधण्याची विनंती करण्यात आली आहे. ही रचना मेट्रो 3 स्टेशनला T2 शी जोडेल. विमानतळ प्राधिकरण दोन भूमिगत स्थानकांच्या वर कायमस्वरूपी फोरकोर्ट स्थापन करण्याची योजना आखत आहेत, ज्यामुळे T2 वर थेट प्रवेश मिळेल. (हेही वाचा: 12th Vasai-Virar Marathon: पश्चिम रेल्वे 8 डिसेंबर रोजी वसई-विरार मॅरेथॉनच्या सहभागींसाठी चालवणार विशेष गाड्या; जाणून घ्या वेळा)
मेट्रो 3 च्या दुसऱ्या टप्प्यातील स्थानके:
कफ परेड, विधानभवन, चर्चगेट, हुतात्मा चौक, सीएसटी मेट्रो, काळबादेवी, गिरगाव, ग्रँट रोड, जगन्नाथ शंकर शेठ मेट्रो, महालक्ष्मी, विज्ञान केंद्र, आचार्य अत्रे चौक, वरळी, सिद्धिविनायक, दादर, सीतलादेवी, धारावी, बीकेसी.