COVID 19 Vaccine Shortage In Maharashtra: कोविड 19 लसीच्या तुटवड्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी रोहित पवारांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना दिला 'हा' सल्ला!
राज्यात सध्या लसीच्या तुटवड्यामुळे अनेकठिकाणी लसीकरण प्रक्रिया तात्पुरती बंद पडली आहे.
महाराष्ट्रात मागील दीड महिन्यामध्ये स्फोटक प्रमाणामध्ये कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. अशामध्ये राज्यात आरोग्याच्या दृष्टीने आणीबाणीची परिस्थिती असताना नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी कोविड 19 लसीकरण वाढवण्याकडे राज्य सरकारचा भर आहे. पण कोविड 19 लसीचा तुटवडा (COVID 19 Vaccine Shortage) निर्माण झाल्याने अनेक ठिकाणी लसीकरण केंद्र बंद झाल्याची स्थिती आहे. दरम्यान या परिस्थितीवरून सध्या केंद्र आणि राज्य सरकार मध्ये शाब्दिक वाकयुद्धांच्या फैरी झाडल्या जात असताना आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी देखील या प्रकरणामध्ये उडी मारत केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना सल्ला देत विरोधकांना टोला लगावणारं एक ट्वीट केले आहे. नक्की वाचा: दर आठवड्याला किमान 40 लाख Covid19 Vaccine चा पुरवठा करण्याची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची केंद्राकडे मागणी.
रोहित पवारांनी ट्वीटर वर 'कोरोनाबाबत केंद्राच्या मार्गदर्शक तत्वानुसारच सरकार निर्णय घेत असताना केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचं वक्तव्य ऐकून आश्चर्य वाटलं. लसीसंदर्भात राज्यातील विरोधक शांत असले तरी सरकारने वस्तुस्थिती मांडलीय.त्यामुळं राज्याला एकत्रच ३-४ कोटी डोस उपलब्ध करून केंद्राने हा प्रश्न निकाली काढावा.' असं म्हटलं आहे. तर 'नाहीतरी सध्या काही राज्यात निवडणूक सुरू असल्याने त्या संपेपर्यंत तिथला कोरोना शांत बसला आहे. त्यामुळं तिथं लसीची तेवढी गरज नाही. तोपर्यंत तरी देशाचा मोठा आर्थिक डोलारा सांभाळत असलेल्या महाराष्ट्राला केंद्रीय आरोग्यमंत्री
डॉ. हर्षवर्धन साहेबांनी लसींचा पूर्ण साठा पाठवून द्यावा.' असं खोचक ट्वीट केले आहे.
रोहित पवार ट्वीट
दरम्यान आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्राकडे महाराष्ट्रासाठी आठवड्याला किमान 40 लाख डोस देण्याची मागणी केली आहे. राज्यात सरकारचा येत्या काही दिवसांत प्रतिदिन 6 लाख डोस देण्याचा मानस आहे. तो आम्ही इतक्यात त्याहून अधिक वाढवणार नाही अशी ग्वाही देत तात्काळ लसीचा तुटवडा भरून काढावा असं म्हटलं आहे. यासोबतच राज्यात तरूण वर्गामध्ये कोरोना संसर्गाचं प्रमाण अधिक असल्याने सरकारने 25 वर्षांखालील नागरिकांच्या सरसकट लसीकरणाला परवानगी द्यावी अशी आग्रही मागणी देखील करण्यात आली आहे. राज्यात सध्या लसीच्या तुटवड्यामुळे अनेकठिकाणी लसीकरण प्रक्रिया तात्पुरती बंद पडली आहे.