पतंजलिचे कोरोना औषध 'Coronil' विषयी आयुष मंत्रालयाने मागवली माहिती; औषधाच्या प्रसिद्धीवर, जाहिरातीवर घातली बंदी
भारतसह परदेशातील अनेक देश याबाबत मेडिसिन आणि लस विकसित करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. दरम्यान, बाबा रामदेव (Baba Ramdev) आणि आचार्य बालकृष्ण यांनी त्यांच्या पतंजलि आयुर्वेदच्या (Patanjali Ayurveda) वतीने
देशभरात कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमितांची दिवसेंदिवस वाढत आहे. भारतसह परदेशातील अनेक देश याबाबत मेडिसिन आणि लस विकसित करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. दरम्यान, बाबा रामदेव (Baba Ramdev) आणि आचार्य बालकृष्ण यांनी त्यांच्या पतंजलि आयुर्वेदच्या (Patanjali Ayurveda) वतीने, कोरोना व्हायरस औषध बनवल्याचा दावा केला आहे. मंगळवारी बाबा रामदेव यांनी कोरोनिल (Coronil) नावाचे औषध लोकांसमोर मांडले. आता आयुष मंत्रालयाने (Ayush Ministry) पतंजलि आयुर्वेदला या औषधाविषयी संपूर्ण माहिती पुरवण्यास सांगितले आहे. आयुष मंत्रालयाने म्हटले आहे की, त्यांना या औषधासंदर्भात तथ्यांचे दावे आणि वैज्ञानिक संशोधनाविषयी कोणतीही माहिती नाही.
यासह आयुष मंत्रालयाने पतंजलि आयुर्वेद यांना औषधाच्या दाव्यांची जाहिरात करणे व त्याची प्रसिद्धी करणे थांबवण्यास सांगितले आहे. आयुष मंत्रालयाने म्हटले आहे की, या प्रकरणाची योग्य चौकशी होईपर्यंत ही बंदी कायम राहील. मंत्रालयाने उत्तराखंड सरकारच्या संबंधित राज्य परवाना प्राधिकरणास, या कोविड-19 च्या उपचारांसाठी दावा केलेल्या उत्पादनाशी संबंधित परवान्याची माहिती आणि या आयुर्वेदिक औषधांच्या परवानगी विषयीची माहिती देण्यास विनंती केली आहे.
पतंजलि आयुर्वेद लिमिटेडला, कोविड-19 चा उपचार घेण्यास सक्षम असल्याचा दावा केला जात असलेल्या औषधाचे नाव व त्याची रचना याची माहिती लवकरात लवकर द्यावी असे मंत्रालयाने सांगितले आहे. यामध्ये ज्या ठिकाणी व रुग्णालयात संशोधन व अभ्यास केला गेला, त्याबद्दलही माहिती मागवली आहे. याव्यतिरिक्त, प्रोटोकॉल, नमुना आकार, इंस्टीट्यूशनल एथिक्स कमेटी क्लीयरंस, सीटीआरआय नोंदणी आणि रिजल्ट ऑफ स्टडीज (IES) याविषयी माहितीही मागविली गेली आहे. (हेही वाचा: मुंबईच्या मालाड परिसरात 70 कोरोना व्हायरस रुग्ण बेपत्ता; शोधकार्यासाठी BMC ने मागितली पोलिसांकडे मदत)
औषध लॉन्चिंगवेळी पतंजलिचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बालकृष्ण यांनी असा दावा केला होता की, हे औषध 3 ते 14 दिवसात कोरोनामुळे ग्रस्त रूग्णांचा उपचार करू शकेल. हरिद्वारमधील पतंजलि योगपीठ येथे लॉन्चिंग दरम्यान बाबा रामदेव म्हणाले की, कोरोनिल औषधाचे उपचार करण्यात आलेल्या कोरोना रूग्णांपैकी 69 टक्के रुग्ण तीनच दिवसात ठीक झाले आहेत आणि 7 दिवसांमध्ये 100 टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले.