Odisha: अंधश्रद्धेचा कळस! ओडिशामध्ये गावकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये कुत्रीशी लावले दोन मुलांचे लग्न; समोर आले धक्कादायक कारण
ओडिशाच्या काही समाजात कुत्राव्यतिरिक्त झाडाशी लग्न करण्याचीही परंपरा आहे. याआधी अनेकवेळा अशी प्रकरणे समोर आली आहे.
आपल्या देशातील बर्याच भागात जुन्या परंपरा आणि अंधश्रद्धा यांना अजून फार महत्व आहे. अशीच एक परंपरा आजही ओडिशाच्या (Odisha) मयूरभंज जिल्ह्यात सुरू आहे. ओडिशाच्या हो (Ho) जमातीत मुलांचे वरचे दात आधी आले तर त्यांचे कुत्र्यांशी लग्न करण्याची परंपरा आहे. मुलांचे वरचे दात पहिल्यांदा येणे हे 'अशुभ' मानले जातात. अशा परिस्थितीत जर मुलाचे वरचे दात आधी आले तर त्याचे कुत्रीशी, व मुलीचे वरचे दात आधी आले तर तिचे कुत्र्याशी लग्न लावले जाते. मागच्या शुक्रवारी अशाच प्रकारची बाब जिल्ह्यातील सुकरौली ब्लॉकच्या गम्भारिया गावात घडली.
या ठिकाणी दोन मुलांचे वरचे दात आधी दिसू लागल्याने त्यांचा विवाह एका कुत्रीशी लावण्यात आला. वरच्या दातांमुळे निर्माण झालेला अपशगुन टाळण्यासाठी डेबेन चत्तर आणि नोरेन पूर्ति यांनी या परंपरेचे पालन केले. माहितीनुसार, ही परंपरा मकर संक्रांती ते शिवरात्र दरम्यान पार पडली जाते. ही परंपरा या समाजातील अनेक पिढ्यांपासून चालत आली आहे. अशाप्रकारे आपल्या मुलाचे वरचे दात पहिल्यांदा आल्याने पुर्तीने आपल्या मुलाचा 'लग्न' सोहळा आयोजित केला होता. यामध्ये दोन मुलांना नवरा बनवले गेले व कुत्री वाढू झाली होती. या सोहळ्यास गावातील इतर लोकदेखील उपस्थित होते.
याबाबत मयूरभंजचे पोलिस अधिक्षक म्हणाले की, त्यांनी या भागात अंधश्रद्धेविरुद्ध जनजागृती करण्यासाठी पावले उचलली आहेत. ओडिशाच्या काही समाजात कुत्राव्यतिरिक्त झाडाशी लग्न करण्याचीही परंपरा आहे. याआधी अनेकवेळा अशी प्रकरणे समोर आली आहे. (हेही वाचा: माता न तूं, वैरिणी! कुऱ्हाडीचे घाव घालून आईने केली 24 वर्षीय मुलाची हत्या; अंधश्रद्धेतून घडले कृत्य)
दरम्यान, काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशमध्ये निवारी जिल्ह्यातील पुछीकरगुआ गावात राहणारे मूलचंद नायक यांनी आपल्या रश्मी नावाच्या कुत्रीचा विवाह, उत्तर प्रदेशातील बकवा खुर्द येथे राहणाऱ्या अशोक यादवच्या गोलू नावाच्या कुत्र्याशी केला. लग्नात तब्बल 1 हजार लोक सामील झाले होते. यासह फटाक्यांसह बॅन्ड वाजवताना रात्री उशिरा मिरवणूकही काढण्यात आली होती.