Atiq Ahmed Shot Dead: पत्रकार बनून आले होते हल्लेखोर, गोळीबार करणाऱ्या तिन्ही आरोपींना अटक

पोलिसांनी सांगितलं की, त्यांनी गोळीबार करणाऱ्या तिन्ही आरोपींना अटक केली

Atiq And Ashraf Ahmad (Image Credit - ANI Twitter)

माफिया आणि राजकारणी अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद यांची प्रयागराजमध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या दोघांना पोलीस वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जात असताना तीन अज्ञातांनी या दोघांवर अगदी जवळून हल्ला केला. या दोघांचीही डोक्यात गोळी झाडून हत्या करण्यात आली. अतिक आणि त्याच्यावर हल्ला करणारे हल्लेखोर कोण होते त्यांच्या उद्देश काय होता याचा तपास पोलीस करत आहे. दरम्यान  गोळीबार झाला तेव्हा माध्यमांचे प्रतिनिधी त्यांना काही प्रश्न विचारत होते. दोन्ही भावांनी बोलायला सुरुवात केली तेवढ्यात त्यांच्यावर गोळीबार झाला.हल्लेखोर माध्यमांचे प्रतिनिधी बनून तिथे आले होते. हल्लेखोरांनी गळ्यात माध्यमांचं ओळखपत्रदेखील अडकवलं होतं. पोलिसांनी सांगितलं की, त्यांनी गोळीबार करणाऱ्या तिन्ही आरोपींना अटक केली आहे. (Atiq Ahmed Shot Dead on Camera Video: माफिया-राजकारणी आणि त्याचा भाऊ अश्रफ यांना गोळ्या झाडून करण्यात आले ठार, मारल्या गेलेल्या ठिकाणाचे पहा दृश्य)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी घटनास्थळावरून तीन पिस्तूलं, एक मोटरसायकल, एक व्हिडीओ कॅमेरा जप्त केला आहे. तसेच त्यांना तिथे एका वृत्तवाहिनीचा लोगो सापडला आहे. यावरुन हे तिघे माध्यम प्रतिनिधी बनुन आले होते हे स्पष्ट होते.दरम्यान या हल्ल्यानंतर उत्तर प्रदेशमधल्या योगी आदित्यनाथ सरकारवरही टीका होऊ लागली आहे. उत्तर प्रदेशात पोलिसांच्या सुरक्षेतही आरोपीवर हल्ला झाल्याने पोलिसांचीही नाचक्की झाली आहे.