Madhya Pradesh: लोड शेडींगचा फटका! लग्नात वीज गेल्याने वधूंची झाली अदलाबदल, भलत्याच पुरुषांशी लावले लग्न

नंतर पंडितांशी बोलून दोन्ही विवाह परत लावण्यात आले. त्यावेळी ज्या वराचे लग्न ज्या वधूशी होणार होते त्याच्याशीच लावले गेले

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo credit : pixabay)

लग्नामध्ये घडणाऱ्या फजित्या, गमती-जमती आपण सगळ्यांनीच अनुभवल्या असतील. मात्र नुकतेच मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) उज्जैन (Ujjain) जिल्ह्यात लग्नामध्ये घडलेली एक घटना ऐकून सगळेच थक्क झाले. तर उन्हाळ्यात लोड शेडींग ही सर्वसामान्य समस्या बनली आहे, परंतु वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे लग्नात चक्क वधू बदलली गेली. होय, आणि जेव्हा पाच तासांनी वीज परत आली तेव्हा वास्तव समोर आले. त्यानंतर ताबडतोब चूक सुधारून ज्या वधूसोबत ज्या मुलाचे लग्न होणार होते ते लग्न परत लावण्यात आले.

तर हे प्रकरण उज्जैनच्या दंगवाड़ा गावचे आहे, जिथे रमेश लाल रेलोत यांच्या तीन मुलींचे लग्न एकाच दिवशी होणार होते. मोठी मुलगी कोमल हिचे लग्न दिवसा झाले, पण निकिता आणि करिश्मा या दोन मुलींची वरात रात्री आली. दोन्ही वर डांगवाडा गावातून आले होते. निकिताचा विवाह भोलाशी आणि करिश्माचा गणेशशी विवाह होणार होता. मात्र फेरे सुरु व्हायच्या आधी वीज गेली आणि त्यामुळे झालेल्या गोंधळात दोन्ही वधूंची अदलाबदल झाली.

निकिताने गणेशसोबत फेरे घेतले, तर करिश्माने भोलासोबत. दोन्ही नववधू बहिणी होत्या त्यामुळे त्यांचा पोशाखही जवळजवळ एकसारखा होता. दोघींनीही तोंडावरून पदर घेतला होता, त्यामुळे कोणाला काहीच कळले नाही. सर्वजण लग्नाच्या विधीमध्ये व्यस्त होते. परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी वधूची पाठवणी होऊन ती जेव्हा सासरी गेली तेव्हा हा प्रकार लक्षात आला. तेव्हा वादाची परिस्थिती निर्माण झाली. (हेही वाचा: सर्वसामान्यांना महागाईचा आणखी एक झटका! जूनपासूनपासून गव्हाचे पीठ, ब्रेड, बिस्किटांसह 'हे' पदार्थ महागणार)

परिणामी तीनही कुटुंबांनी एकत्र येऊन त्यावर तोडगा काढण्याचा विचार केला. नंतर पंडितांशी बोलून दोन्ही विवाह परत लावण्यात आले. त्यावेळी ज्या वराचे लग्न ज्या वधूशी होणार होते त्याच्याशीच लावले गेले. मात्र वीजपुरवठा खंडित झाल्याबद्दल संताप व्यक्त करताना कुटुंबीयांनी सांगितले की, दररोज पाच तास वीजपुरवठा खंडित होत असून त्यामुळे लग्नात हा मोठा गोंधळ निर्माण झाला.