LPG Gas Cylinder: पुन्हा एकदा एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीमध्ये वाढ; फेब्रुवारीमध्ये तिसऱ्यांदा झाली दरवाढ
हे एलपीजी अनुदान थेट ग्राहकांच्या बँक खात्यात जमा केले जाते. गॅसच्या सततच्या वाढत्या किंमतींमुळे केंद्र सरकारला ग्राहकांच्या खिशावरील बोजा थोडाफार कमी करायचा आहे
स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या एलपीजी सिलिंडरच्या (LPG Gas Cylinder) किंमती पुन्हा वाढल्या आहेत. आयओसीने फेब्रुवारी महिन्यात 14.2 किलो एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत तिसऱ्यांदा वाढ केली आहे. यापूर्वी 4 फेब्रुवारी आणि 14 फेब्रुवारीला किंमती वाढविण्यात आल्या होत्या. राजधानी दिल्लीत घरगुती एलपीजीच्या किंमतीत 25 रुपयांनी वाढ झाली आहे. आज गुरुवारी (25 फेब्रुवारी 2021) दिल्लीत एलपीजी सिलिंडरची किंमत 769 रुपयांवरून वाढून 794 रुपयांवर गेली आहे. डिसेंबरमध्ये एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत दोनदा वाढ करण्यात आली होती. 1 डिसेंबर रोजी त्याचा दर 594 रुपयांवरून 644 रुपये करण्यात आला आणि नंतर 15 डिसेंबरला त्याची किंमत पुन्हा वाढवून 694 रुपये केली गेली.
म्हणजेच एका महिन्यात 100 रुपये वाढविण्यात आले. परंतु जानेवारीत किंमती वाढविण्यात आल्या नाहीत. जानेवारीत विना अनुदानित एलपीजी (14.2 KG) ची किंमत 694 रुपये होती. परंतु 4 फेब्रुवारीला दर पुन्हा वाढवून 719 रुपये करण्यात आला, म्हणजेच 25 रुपयांची वाढ झाली. त्यानंतर पुन्हा एकदा दहा दिवसातच एलपीजीच्या किंमतीत 50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. म्हणजेच केवळ फेब्रुवारीमध्येच एलपीजी सिलिंडर्सच्या किंमती 100 रुपयांनी वाढल्या आहेत. एलपीजीच्या किंमती अशा वेळी वाढल्या आहेत जेव्हा भारतातील पेट्रोलचे दर आतापर्यंतच्या उच्चांकाला पोहोचले आहेत.
दरम्यान, एलपीजी खरेदीवर सरकारकडून ग्राहकांना सबसिडी दिली जात आहे. हे एलपीजी अनुदान थेट ग्राहकांच्या बँक खात्यात जमा केले जाते. गॅसच्या सततच्या वाढत्या किंमतींमुळे केंद्र सरकारला ग्राहकांच्या खिशावरील बोजा थोडाफार कमी करायचा आहे. म्हणूनच सरकार एलपीजी खरेदीवर ग्राहकांना सबसिडी देत आहे. एलपीजीचे अनुदान स्वतंत्रपणे राज्यांनुसार निश्चित केले गेले आहे. ज्यांचे वार्षिक उत्पन्न दहा लाख रुपये आहे अशा ग्राहकांना हे अनुदान मिळू शकत नाही. हे दहा लाख रुपये वार्षिक उत्पन्न पती-पत्नी दोघांचे मिळून आहे.