LPG Cylinder in India: एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत 10 रुपयांनी कपात, नवे दर आजपासून लागू

या नवीन दरानुसार, 14.2 किलोच्या एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत 819 वरुन 809 वर पोहोचली आहे.

Gas Cylinder (Photo Credits: Twitter)

सामान्य नागरिक महागाईने होरपळून निघत असताना एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. एलपीजी सिलेंडरचे (LPG Gas Cylinder) दर 10 रुपयांनी घसरले असून नवे दर आजपासून लागू होणार आहेत. या नवीन दरानुसार, 14.2 किलोच्या एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत 819 वरुन 809 वर पोहोचली आहे. मुंबईत सुद्धा हेच दर लागू होतील. कोलकातामध्ये 845.50 रुपयांवरून 835.50 रुपयांना सिलेंडर मिळेल. तर चेन्नईमध्ये 825 रुपयांनी घरगुती सिलेंडर मिळेल. या घोषणेनंतर सामामन्य नागरिकांचा जीव भांड्यात पडला आहे.

देशभरात इंधन दरवाढ झपाट्याने होत असल्याने अन्न-धान्याच्या किंमतीतही झपाट्याने वाढ झाली. त्यामुळे जनता पूर्णपणे हवालदिल झाली होती. एकीकडे कोरोना व्हायरस आणि त्यात आलेले बेरोजगारीचे संकट यामुळे उदरनिर्वाह करायचा कसा असा मोठा प्रश्न जनतेसमोर होता. त्यात LPG गॅसच्या किंमतीत घट झाल्याने नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला आहे.हेदेखील वाचा- Rules Changing From 1st April: नव्या आर्थिक वर्षात बदलणार हे '6' नियम

मागच्या काही काळापासून कच्च्या तेलाची किंमत घसरताना दिसून येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात तो 64 डॉलरच्या पातळीवर ट्रेड करीत होता. मार्चच्या सुरुवातीच्या आठवड्यात तो 71 डॉलर पर्यंत पोहोचला होता. किरकोळ पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीं क्रूड तेलाच्या दरावर अवलंबून असते, असे सरकारी सूत्रांनी सांगितले.

सिलेंडर स्वस्त कसा मिळवाल?

इंडियन ऑईलच्या मते, जर तुम्ही एलपीजी सिलिंडर म्हणजेच इंडेन गॅस सिलिंडर बुक कराल तर त्यावर तुम्हाला 50 रुपयांची कॅशबॅक मिळू शकेल. हे करण्यासाठी, आपल्याला अॅमेझॉन (Amazon) पेद्वारे एलपीजी सिलिंडर बुक करावा लागेल. अॅमेझॉन पे वरून गॅस सिलेंडरची रक्कम भरताच तुम्हाला 50 रुपयांच्या कॅशबॅकचा फायदा मिळेल आणि अशा प्रकारे आपल्याला गॅस सिलिंडर 50 रुपयांनी स्वस्त मिळेल.