Lok Sabha Election 2024: येत्या 19 एप्रिल सकाळी 7 ते 1 जून संध्याकाळी 6:30 पर्यंत एक्झिट पोलवर बंदी; Election Commission ने जारी केली अधिसूचना
मतदानाच्या सुरुवातीपासून मतदान संपल्यानंतर अर्ध्या तासापर्यंत एक्झिट पोलवरील बंदी कायम राहणार आहे.
Lok Sabha Election 2024: निवडणूक आयोगाने एक अधिसूचना जारी केली आहे, ज्यानुसार 19 एप्रिल रोजी सकाळी 7 ते 1 जून रोजी संध्याकाळी 6:30 या वेळेत एक्झिट पोल आयोजित करण्यास, प्रकाशित करण्यास किंवा प्रसिद्ध करण्यास बंदी घालण्यात आली आहे. याच काळात लोकसभेशिवाय चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी वेगवेगळ्या टप्प्यात मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाच्या अधिसूचनेत असेही स्पष्ट करण्यात आले आहे की, लोकप्रतिनिधी कायद्याच्या तरतुदींनुसार, निवडणूक सर्वेक्षणाच्या निकालांसह अशा कोणत्याही निवडणूक सामग्रीचे कोणतेही मत सर्वेक्षण किंवा इतर कोणतेही प्रदर्शन प्रतिबंधित असेल.
लोकसभा निवडणुकीव्यतिरिक्त आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, ओडिशा आणि सिक्कीमच्या विधानसभेच्या निवडणुकाही होणार आहेत. याच काळात 12 राज्यांतील 25 विधानसभा जागांसाठी स्वतंत्र पोटनिवडणूकही होणार आहे. अधिसूचनेत निवडणूक आयोगाने आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम आणि ओडिशामध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांशी संबंधित एक्झिट पोल आयोजित करण्यास, प्रकाशित करण्यास किंवा प्रसिद्ध करण्यास बंदी घातली आहे.
ही बंदी 19 एप्रिल रोजी सकाळी 7 वाजता सुरू होईल आणि 1 जून रोजी संध्याकाळी 6.30 वाजता संपेल. ही बंदी प्रिंट, इलेक्ट्रॉनिक किंवा इतर कोणत्याही प्रसार पद्धतीसह सर्व प्रकारच्या माध्यमांना लागू आहे. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी नवदीप रिनवा यांनी सांगितले की, या कालावधीत कोणतीही व्यक्ती मतदान सर्वेक्षणाचे निकाल छापील किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे प्रकाशित किंवा प्रसारित करू शकणार नाही. मतदानाच्या सुरुवातीपासून मतदान संपल्यानंतर अर्ध्या तासापर्यंत एक्झिट पोलवरील बंदी कायम राहणार आहे. (हेही वाचा: तब्बल 238 वेळा हरूनही मानली नाही हार; तामिळनाडूचे K. Padmarajan पुन्हा एकदा रिंगणात उतरणार, लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले नाव)
जर कोणीही याचे उल्लंघन करताना आढळून आले तर त्याला दोन वर्षांपर्यंत कारावास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. यासह, निवडणूक अधिकारी म्हणाले की, आदर्श आचारसंहितेच्या काळात निवडणूक आयोगाने फेक न्यूज आणि पेड न्यूजची ओळख पटवण्यासाठी आणि कारवाईसाठी एसओपी तयार केली आहे.