Kia PV7 Van Photos: कार की फिरते घर? सीट काढण्याची सोय आणि 100W फास्ट चार्जिंग; कियाच्या नव्या इलेक्ट्रिक व्हॅनची हवा
दक्षिण कोरियन वाहन उत्पादक कंपनी कियाने 'पीव्ही५' नंतर आपली नवीन 'पीव्ही७' ही मोठी इलेक्ट्रिक व्हॅन जागतिक स्तरावर सादर केली असून ती पॅसेंजर आणि कार्गो अशा दोन प्रमुख प्रकारांमध्ये उपलब्ध असेल.
दक्षिण कोरियन वाहन उत्पादक कंपनी कियाने (Kia) आपल्या समर्पित 'प्लॅटफॉर्म बियॉन्ड व्हेईकल' (PBV) मालिकेतील दुसरी इलेक्ट्रिक व्हॅन 'पीव्ही७' (PV7) जागतिक बाजारपेठेत सादर केली आहे. जर्मनीतील हॅनोव्हर येथे आयोजित 'आयएए ट्रान्सपोर्टेशन २०२६' प्रदर्शनात या वाहनाचे अनावरण करण्यात आले. कंपनीने यापूर्वी सादर केलेल्या 'पीव्ही५' पेक्षा ही आकाराने मोठी असून ती व्यावसायिक वापरासोबतच प्रवासी वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. ही इलेक्ट्रिक व्हॅन 'पॅसेंजर' आणि 'कार्गो' अशा दोन स्वतंत्र प्रकारांमध्ये आणण्यात आली आहे.
पॅसेंजर आणि कार्गो आवृत्तीची वैशिष्ट्ये
किया पीव्ही७ ची पॅसेंजर आवृत्ती शटल सेवा, कौटुंबिक प्रवास आणि कॉर्पोरेट प्रवाशांच्या वाहतुकीसाठी तयार करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ही ९-आसनी, तर दक्षिण कोरियामध्ये ११-आसनी पर्यायात उपलब्ध असेल. याशिवाय, अतिरिक्त सामानासाठी जागा तयार करता यावी म्हणून सीट काढून ठेवण्याची सोय असलेला ७-आसनी पर्यायही यात दिला जाईल. दुसरीकडे, कार्गो आवृत्ती व्यावसायिक वाहतूकदारांसाठी असून तिची कमाल भारवहन क्षमता १,२०० किलोग्रॅमपर्यंत आहे.
Image KIA Twitter
बॅटरी पर्याय आणि ४६० किमीपर्यंतची रेंज
ही इलेक्ट्रिक व्हॅन कंपनीच्या प्रगत 'ई-जीएमपी.एस' (E-GMP.S) आर्किटेक्चरवर आधारलेली आहे. ग्राहकांना यामध्ये ७१.५ किलोवॅट-तास (kWh) आणि ९६.२ किलोवॅट-तास (kWh) अशा दोन बॅटरी पॅकचे पर्याय मिळतील. हे दोन्ही पर्याय २६८ एचपी पॉवर आणि ४०० एनएम टॉर्क निर्माण करणाऱ्या फ्रंट-माउंटेड इलेक्ट्रिक मोटरशी जोडलेले आहेत. डब्लूएलटीपी (WLTP) चाचणीनुसार ही व्हॅन एका चार्जमध्ये ४६० किलोमीटरहून अधिक रेंज देऊ शकते. भविष्यात कंपनी याचा ड्युअल-मोटर ऑल-व्हील-ड्राइव्ह (AWD) प्रकारही सादर करणार आहे.
जलद चार्जिंग आणि आधुनिक तंत्रज्ञान
किया पीव्ही७ मध्ये ८०० व्होल्टची हाय-स्पीड चार्जिंग प्रणाली देण्यात आली आहे. ३५० किलोवॅट क्षमतेच्या डीसी फास्ट चार्जरच्या साहाय्याने ही बॅटरी अवघ्या २० ते २५ मिनिटांत १० ते ८० टक्क्यांपर्यंत चार्ज होऊ शकते. यामध्ये व्हेईकल-टू-लोड (V2L) तंत्रज्ञानही आहे, ज्यामुळे बाहेरील उपकरणांना वाहनाच्या बॅटरीद्वारे वीजपुरवठा करता येतो. वाहनाच्या डॅशबोर्डवर १४.६ इंचाची मुख्य इन्फोटेनमेंट स्क्रीन आणि १२.९ इंचाचा डिजिटल डिस्प्ले देण्यात आला असून ही यंत्रणा अँड्रॉइड ऑटोमोटिव्ह ओएसवर आधारित आहे.
जागतिक बाजारातील विक्रीचे नियोजन
कंपनीच्या माहितीनुसार, किया पीव्ही७ ची अधिकृत विक्री २०२७ च्या उत्तरार्धात दक्षिण कोरिया आणि युरोपीय बाजारपेठेत सुरू होईल. त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये ही व्हॅन दाखल केली जाईल. भारतीय बाजारपेठेत ही इलेक्ट्रिक व्हॅन लाँच करण्याबाबत कंपनीने सध्या कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.