Tiger Johnny travels 300 km in search of mate: जोडीदाराच्या शोधात जॉनी वाघाचा 300 किमीचा प्रवास; महाराष्ट्रातून थेट तेलंगणात पोहोचला
महाराष्ट्र ते तेलंगणा असा 300 किमीचा प्रवास वाघाने 30 दिवसात पूर्ण केला. वाघाचा प्रवास रेडिओ कॉलरने ट्रॅक करण्यात आला.
Adilabad: मनूष्य असो वा प्राणी सर्वांनाच योग्य जोडीदार हवा असतो. अशीच एक घटना नुकतीच समोर आली आहे. महाराष्ट्र राज्यातील नांदेडमधील किनवट येथील जॉनी या वाघाने (Tiger Johnny) त्याच्या जोडीदारासाठी 300 किलो मीटर पार करत थेट तेलंगणा गाठले आहे. हे अंतर जॉनीने अवघ्या 30 दिवसांत पार केले. म्हणजेच प्रत्येक दिवशी तो 10 किलोमीटर अंतर पार करत होता. वाघ आपल्या शिकारीसाठी बराच काळ तग धरून असतो. हे सर्वांना माहिती आहे, त्यानंतर शिकार करतो. जोडीदाराच्या शोधात (Search of Mate) तो लांबचा प्रवास करू शकतो हे आता यातून समोर आले आहे. (Bandipur Tiger Reserve: बांदीपूर व्याघ्र प्रकल्पात वेगवेगळ्या रंगाचे डोळे असलेला बिबट्या दिसला)
वन अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हिवाळा हा वाघांच्या मिलनाचा काळ असतो. काही नर वाघांना त्यांच्या परिसरात वाघीण सापडत नाही तेव्हा ते तिच्या शोधात लांबचा प्रवास करतात. या काळात कुटुंब तयार करण्याचे त्यांचे उद्दिष्ट असते. त्यामुळे वाघ वाघिणीचया शोधात त्यांचे क्षेत्र सोडून दुसऱ्या क्षेत्रात प्रवास करतात. अशा वेळा ते भरपूर अंतर पार करतात आणि गंतव्यापर्यंत पोहचतात. जोडीदाराच्या शोधात जॉनीचा प्रवास अदिलाबाद आणि निर्मल जिल्ह्यात जवळपास 30 दिवसांत 300 किलोमीटरहून अधिक झाला आहे. ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यात त्यांनी प्रवास सुरू केला होता. जॉनी वाघाचा प्रवास रेडिओ कॉलरने ट्रॅक करण्यात आला.
जॉनी आता तेलंगणात दाखल झाला आहे. येत्या काही दिवसांत या भागातील जंगलात वाघिणीचे वास्तव्य त्याला सापडण्याची शक्यता आहे. असे जिल्हा वन अधिकारी प्रशांत बी पाटील यांनी तेलंगणा टुडेला सांगितले. अधिकाऱ्यांने सांगितले की, वाघींणीचा एक विशेष गंध वाघांना सुमारे 100 किलोमीटर अंतरावरून घेता येतो. त्यामुळे अनेक किलोनीटर पासून ते जोडीदाराला ओळखू शकतात. वाघिणीच्या गंधामुळे नर वाघ सहजपणे तिला शोधू शकतो. जॉनीने आतापर्यंत आदिलाबाद जिल्ह्यातील बोथ, निर्मल जिल्ह्यातील कुंतला, सारंगपूर, ममदा आणि पेंबी मंडलांच्या जंगलात विहंग करत आहे. (Tiger Death Toll: चिंताजनक! महाराष्ट्रात गेल्या 10 महिन्यांत 40 हून अधिक वाघांचा मृत्यू; जाणून घ्या कारणे)
मिळालेल्या माहितीनुसार, जॉनीने प्रवासात आत्तापर्यंत पाच गुरे मारली आहेत. त्याशिवाय, या भागात त्यांनी आतापर्यंत गायींना मारण्याचे तीन अयशस्वी प्रयत्न केले आहेत. तो उटनूरच्या लालटेकडी गावाजवळ रस्ता ओलांडताना दिसला. नारनूर मंडळात फिरताना दिसला. त्यामुळे स्थानिकांमध्ये घबराट पसरली.