India's COVID-19 Recoveries: भारतात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 15 लाखांच्या पार; 10 राज्यांमध्ये कोविड-19 चा संसर्ग केंद्रीत- आरोग्य मंत्रालय
दिवसागणित वाढत जाणारी कोरोना बाधितांची संख्या चिंतेत भर घालत असताना एक दिलासादायक माहिती समोर येत आहे.
मागील 4-5 महिन्यांपासून देशावर कोरोना व्हायरसचे (Coronavirus) संकट घोंगावत आहे. दिवसागणित वाढत जाणारी कोरोना बाधितांची संख्या चिंतेत भर घालत असताना एक दिलासादायक माहिती समोर येत आहे. आरोग्य मंत्रालयाने (Ministry of Health & Family Welfare) दिलेल्या माहितीनुसार, भारतातील कोरोनामुक्त झालेल्यांचा आकडा 15 लाखांच्या पार गेला आहे. देशातील 10 राज्यांमध्ये कोरोना व्हायरसचा संसर्ग केंद्रीत आहे. त्यामुळे एकूण 80% हून अधिक नवीन रुग्ण या राज्यांमध्ये आढळून येत आहेत. (महाराष्ट्रात कोरोनाचा हाहाकार; राज्यात दिवसभरात 12 हजार 248 नव्या रुग्णांची नोंद, 390 जणांचा मृत्यू)
वेळीच केलेल्या लॉकडाऊनमुळे कोरोना व्हायरस संसर्गाची साखळी तोडण्यास देशाला बहुतांश प्रमाणात यश आले. त्यानंतर कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असली तरी विशेष उपाययोजनांमुळे रिकव्हर होणाऱ्यांचा आकडाही चांगला आहे. त्यामुळे देशाचा रिकव्हरी रेट सातत्याने सुधारत आहे. त्याचबरोबर मृत्यू दर कमी करण्यातही भारत सरकार सफल होत आहे. दरम्यान महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा, गुजरात, आसाम, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि दिल्ली या 10 राज्यांमध्ये कोरोना बाधितांची संख्या सर्वाधिक आहे.
ANI Tweet:
आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, रविवार सकाळी 8 पर्यंत देशातील कोरोना बाधितांचा आकडा 21 लाख 53 हजार 011 इतका होता. त्यापैकी 14 लाख 80 हजार 885 रुग्ण कोरोनामुक्त झाले होते. तर 6 लाख 28 हजार 747 रुग्णांवर सध्या उपचार सुरु होते. दरम्यान देशातील कोरोना संसर्गामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 43 हजार 379 वर पोहचला आहे.