India’s Biggest Drug Bust: केरळमध्ये पकडली देशातील सर्वात मोठी ड्रग्जची खेप; किंमत तब्बल 25,000 कोटी, पाकिस्तानी नागरिकाला अटक

मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची वाहतूक करण्यासाठी या जहाजाचा वापर केला जातो. ही कारवाई करण्यासाठी एनसीबी टीमने आधी माहिती गोळा केली आणि नंतर ती भारतीय नौदलाला शेअर केली. भारतीय नौदलाचे एक जहाज परिसरात तैनात करण्यात आले होते.

India’s Biggest Drug Bust (Photo Credit : ANI)

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) आणि भारतीय नौदलाच्या संयुक्त कारवाईत केरळमध्ये (Kerala) मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ (Drug) जप्त करण्यात आले आहेत. या सोबत एका पाकिस्तानी नागरिकालाही ताब्यात घेतले गेले आहे. त्याला सोमवारी (15 मे 2023) न्यायालयात हजर केले जाईल. शनिवारी (13 मे 2023) आरोपीकडून तब्बल 2525 किलो मेथाम्फेटामाइन ड्रग्ज जप्त करण्यात आले, ज्याची किंमत सुमारे 25 हजार कोटी रुपये आहे. भारतामधील ही आतापर्यंतची सर्वात मोठी ड्रग्ज जप्ती असल्याचे सांगण्यात आले आहे.

या सर्वात मोठ्या ड्रग्ज जप्तीबाबत एनसीबीचे उपमहासंचालक संजय कुमार सिंग म्हणाले, ‘एनसीबी आणि नौदलाने हिंदी महासागरात यशस्वी ऑपरेशन करून हे ड्रग्ज ताब्यात घेतले. देशात यापूर्वी कधीही एवढ्या किमतीचे ड्रग्ज जप्त करण्यात आलेले नाहीत. बाजारात इतक्या जास्त प्रमाणात आलेल्या ड्रग्जची किंमत सुमारे 25 हजार कोटी रुपये आहे. हे इराणमधील चाबहार बंदरातून आणले जात होते आणि त्याचा स्रोत पाकिस्तान आहे.’

अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, ‘मदर जहाज समुद्रात वेगवेगळ्या ठिकाणी तैनात करण्यात आले होते, ज्याद्वारे माल जप्त करण्यात आला होता. ही खेप भारत, श्रीलंका आणि मालदीवसाठी होती. या प्रकरणी एका पाकिस्तानी नागरिकाला अटक करण्यात आली आहे. आम्ही फेब्रुवारी 2022 मध्ये ऑपरेशन 'समुद्र गुप्ता' सुरू केले. त्या ऑपरेशन अंतर्गत, आम्ही सुमारे 4000 किलो विविध ड्रग्ज जप्त केली आहेत.’ (हेही वाचा: Tamil Nadu: तामिळनाडूमध्ये विषारी दारु प्यायल्याने 12 जणांचा मृत्यू, विरोधकांकडून सरकारवर टीकेची झोड)

मदर जहाज हे एक मोठे समुद्री जहाज आहे. मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची वाहतूक करण्यासाठी या जहाजाचा वापर केला जातो. ही कारवाई करण्यासाठी एनसीबी टीमने आधी माहिती गोळा केली आणि नंतर ती भारतीय नौदलाला शेअर केली. भारतीय नौदलाचे एक जहाज परिसरात तैनात करण्यात आले होते. या इनपुटच्या आधारे नौदलाने समुद्रात जाणारे एक मोठे जहाज अडवले. जहाजातून मेथॅम्फेटामाइनची 134 पोती जप्त करण्यात आली. जप्त केलेल्या गोण्या, पाकिस्तानी नागरिक, पकडलेली बोट आणि मुख्य जहाजातून जप्त केलेल्या काही इतर वस्तू 13 मे रोजी कोचीच्या मत्तनचेरी जेटीवर आणण्यात आल्या व त्या पुढील कारवाईसाठी एनसीबीकडे सुपूर्द केल्या गेल्या.