Indians Data On Sale: सावध व्हा! 6 लाख भारतीयांचा डेटा चोरीला; Bot Markets वर विकली गेली वैयक्तिक माहिती
बॉट मार्केटबद्दल बोलायचे तर, हे असे एक व्यासपीठ आहे जे हॅकर्सद्वारे बॉट मालवेअरने प्रभावित झालेल्या वापरकर्त्यांच्या डिव्हाइसेसमधून चोरीला गेलेला डेटा विकण्यासाठी वापरला जाते.
सायबर सुरक्षा (Cyber Security) ही केवळ भारतातच नाही तर जगभरातील इतर देशांसाठीही मोठी समस्या आहे. जवळजवळ दररोज आपण सायबर फसवणूक किंवा एखाद्या वापरकर्त्याचा किंवा संस्थेचा डेटा चोरीला गेल्याची घटना पाहतो. आताही एक अहवाल समोर आला आहे, ज्यामध्ये 6 लाख भारतीयांचा डेटा बॉट मार्केटमध्ये विकला जात असल्याची माहिती देण्यात आली आहे. NordVPN ने अहवाल दिला आहे की, सुमारे पाच दशलक्ष लोकांचा डेटा चोरीला गेला आणि तो बॉट मार्केटवर (Bot Markets) विकला गेला आहे.
यामध्ये जवळपास 12 टक्के म्हणजेच, 6 लाख भारतीयांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. NordVPN जगातील सर्वात मोठ्या VPN सेवा प्रदात्यांपैकी एक आहे. बॉट मार्केटबद्दल बोलायचे तर, हे असे एक व्यासपीठ आहे जे हॅकर्सद्वारे बॉट मालवेअरने प्रभावित झालेल्या वापरकर्त्यांच्या डिव्हाइसेसमधून चोरीला गेलेला डेटा विकण्यासाठी वापरला जाते. नॉर्ड सिक्युरिटीच्या NordVPN ने आपल्या संशोधन अहवालात म्हटले आहे की, चोरी झालेल्या डेटामध्ये वापरकर्त्यांचे लॉगिन, कुकीज, डिजिटल फिंगरप्रिंट, स्क्रीनशॉट आणि इतर माहिती समाविष्ट आहे. (हेही वाचा: मुंबईत सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ, सप्टेंबर 2022 मध्ये 3,668 घटना; 1,000 घटना Online आणि Credit Card Fraud संंबंधीत)
एका व्यक्तीच्या अशा सर्व माहितीची सरासरी किंमत 490 भारतीय रुपये म्हणजेच $ 5.95 आहे. विश्लेषित मार्केटमध्ये किमान 26.6 दशलक्ष चोरलेले लॉगिन आढळले. यामध्ये 720,000 गुगल लॉगिन, 654,000 मायक्रोसॉफ्ट लॉगिन आणि 647,000 फेसबुक लॉगिन यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, संशोधकांना चोरीला गेलेल्या डेटामध्ये 667 दशलक्ष कुकीज, 81,000 डिजिटल फिंगरप्रिंट, 538,000 ऑटो-फिल फॉर्म, अनेक डिव्हाइस स्क्रीनशॉट आणि वेबकॅम स्नॅप आढळले.
दरम्यान, गेल्या काही काळापासून भारताला अनेक सायबर हल्ल्यांना सामोरे जावे लागत आहे. अलीकडेच भारताच्या आरोग्य सेवा क्षेत्रावर मोठा सायबर हल्ला झाला होता. हॅकर्सनी AIMS चे अनेक सर्व्हर हॅक केले होते. अनेक दिवस हे सर्व्हर डाऊन होते. त्यानंतर हॅकर्सनी इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट (ICMR) च्या वेबसाइटवर एकाच दिवसात सुमारे सहा हजार वेळा सायबर हल्ल्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात येत आहे. 30 नोव्हेंबर रोजी सायबर हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला होता.