Indian Railways: मागील 10 दिवसांत भारतीय रेल्वेने महाराष्ट्रातून एकूण 432 आणि दिल्लीतून 1166 विशेष रेल्वे गाड्या चालविल्या
या गाड्यांमध्ये मेल / एक्स्प्रेस गाड्या, प्रवासी गाड्या आणि उपनगरी गाड्या यांचा समावेश आहे.
प्रवाशांच्या सोयीसाठी भारतीय रेल्वे (Indian Railways) देशभरात विशेष रेल्वे गाड्या चालवित आहे. या गाड्यांमध्ये मेल / एक्स्प्रेस गाड्या, प्रवासी गाड्या आणि उपनगरी गाड्या यांचा समावेश आहे. नियमित ट्रेन सेवेव्यतिरिक्त एप्रिल ते मे 2021 दरम्यान उन्हाळ्यासाठी अतिरिक्त विशेष गाड्या चालवल्या जात आहेत. 20 एप्रिल 2021 पर्यंत, भारतीय रेल्वे दररोज सरासरी 1512 विशेष रेल्वे गाड्या (मेल / एक्सप्रेस आणि सण विशेष) चालवित आहे. एकूण 5387 उपनगरीय रेल्वे गाड्या आणि 981 प्रवासी रेल्वे गाड्या देखील कार्यरत आहेत.
21 एप्रिल 2021 पर्यंत, देशभरातील विविध ठिकाणी, भारतीय रेल्वे दररोज, उत्तर रेल्वे विभागाकडून (दिल्ली परिसर) 53 विशेष रेल्वे गाड्या, मध्य रेल्वेकडून 41 विशेष रेल्वे गाड्या आणि पश्चिम रेल्वेकडून 5 विशेष रेल्वे गाड्या चालवीत आहे. 12 एप्रिल 2021 ते 21 एप्रिल 2021 या कालावधीत भारतीय रेल्वेने मध्य आणि पश्चिम रेल्वे विभागातून एकूण 432 विशेष रेल्वे गाड्या आणि उत्तर रेल्वे विभागातून (दिल्ली क्षेत्र) 1166 विशेष रेल्वे गाड्या चालविल्या आहेत.
भारतीय रेल्वे मार्गांवरील मागणीनुसार विशेष गाड्या चालविणार आहे. प्रवाशांची कोणतीही गैरसोय न होता त्यांना आरामात प्रवास करता यावा यासाठी भारतीय रेल्वे सर्व प्रयत्न करेल. कोणत्याही विशेष मार्गावरील अल्पकालिक सूचनेवर गाड्या चालविण्यासाठी भारतीय रेल्वे पूर्णपणे सज्ज आहे.
कोविडची सद्यस्थिती लक्षात घेता कोविड मार्गदर्शक तत्त्वे आणि प्रोटोकॉलच्या संदर्भात रेल्वे प्रवासी आणि सामान्य जनतेमध्ये जन जागृती करण्यासाठी भारतीय रेल्वे सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.