भारतात लॉकडाऊन वाढविल्यामुळे भारतीय रेल्वे सेवा 3 मे रात्री 12 वाजेपर्यंत स्थगित
या दरम्यान सर्व लोकल, मेल, पॅसेंजर, एक्सप्रेस, मेट्रो, कोकण रेल्वे सेवा बंद राहणार असून 3 मे रात्री 12 वाजेपर्यंत स्थगित केल्या असल्याची माहिती भारतीय रेल्वेने (Indian Railway) दिली आहे.
भारतात कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी 21 दिवसांचा लॉकडाऊन आज 3 मे पर्यंत वाढविला असल्याची घोषणा केली. या पार्श्वभूमीवर कोरोनाविरुद्धचा लढा यशस्वी होण्यास मदत होईल. नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार होते. त्यामुळे समस्त देशवासियांसोबत सर्व सरकारी यंत्रणांचे त्याकडे लक्ष होते. मात्र आता लॉकडाऊनचे निश्चित झाल्यानंतर भारतीय रेल्वेने 3 मे पर्यंत रेल्वे सेवा स्थगित केल्याची माहिती दिली आहे. या दरम्यान सर्व लोकल, मेल, पॅसेंजर, एक्सप्रेस, मेट्रो, कोकण रेल्वे सेवा बंद राहणार असून 3 मे रात्री 12 वाजेपर्यंत स्थगित केल्या असल्याची माहिती भारतीय रेल्वेने (Indian Railway) दिली आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉक डाउनच्या (Lockdown) कालावधीत 3 मे पर्यंत वाढ करण्यात येत असल्याची घोषणा मोदींनी केली. कोरोनामुळे वाढलेल्या लॉक डाऊन काळात नागरिकांनी काय करावे आणि काय करू नये याबाबत सांगताना मोदींनी आपला 7 नियमांचा एक मास्टर प्लॅन सांगितला आहे. या नियमांचे पालन केल्यास लवकरच आणि निश्चितच आपण कोरोनावर मात करू असा विश्वास सुद्धा मोदींनी व्यक्त केला आहे. लोक घराबाहेर पडू नये यासाठी भारतीय रेल्वे ने देखील संपूर्ण रेल्वे सेवा 3 मे रात्री 12 पर्यंत स्थगित केली आहे.
पाहा ट्विट:
भारतात आज कोरोना बाधितांची एकूण संख्या ही 10,363 वर जाऊन पोहोचली आहे. यात 8988 सक्रिय केसेस, 1035 डिस्चार्ज मिळालेले रुग्ण तसेच 339 मृत्यू झालेल्या रुग्णांचा समावेश आहे अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. यापुढे कोरोनात वाढ होऊ नये, नवे हॉटस्पॉट निर्माण होऊ नयेत, लोकांचे दुर्दैवी मृत्यू होऊ नयेत याची काळजी आपण प्रत्येकाने घ्यायची आहे असे आवाहन मोदींनी केले आहे.