Indian Parliament Attack 2001: संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याची 21 वर्षे; 45 मिनिटांच्या दहशतीने हादरला होता संपूर्ण देश, जाणून घ्या नक्की काय घडले

त्यामुळे यावेळी जास्तीत जास्त लोकप्रतिनिधी सभागृहात उपस्थित असणार हे दहशतवाद्यांना ठाऊक होते, म्हणूनच त्यांनी 13 डिसेंबरची तारीख निवडली असावी.

File Image | Parliament of India (Photo Credits: ANI)

जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या मंदिरावर म्हणजेच आपल्या संसदेवर झालेल्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या हल्ल्याला (Indian Parliament Attack 2001) आज 21 वर्षे पूर्ण होत आहेत. 13 डिसेंबर 2001 च्या सकाळी भारताचे संसद भवन गोळीबाराच्या आवाजाने हादरून गेले होते. पाकिस्तानात बसलेल्या दहशतवाद्यांच्या सूत्रधारांनी भारतीय लोकशाही अस्थिर करण्याचा केलेला हा नापाक प्रयत्न होता. जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैयबाचे दहशतवादी संसदेच्या संकुलात घुसण्यात तर यशस्वी झाले, परंतु देशाच्या शूर जवानांनी त्यांचा डाव हाणून पाडला.

हा हल्ला झाला तेव्हा संसद भवनात 200 खासदार उपस्थित होते, पण शूर जवानांनी लावलेल्या जीवाच्या बाजीमुळे या खासदारांना ओरखडाही आला नाही. या गोळीबारात एकूण पाच दहशतवादी ठार झाले, तर 6 सुरक्षा जवान शहीद झाले. या हल्ल्याचा सूत्रधार अफजल गुरूला नंतर 2013 मध्ये फाशी देण्यात आली.

नक्की काय घडले?

तर त्यावेळी संसदेत हिवाळी अधिवेशन सुरू होते. यासाठी विविध पक्षांचे खासदार उपस्थित होते. सभागृहामध्ये झालेल्या गदारोळानंतर दोन्ही सभागृहांचे कामकाज सुमारे 45 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले होते. यानंतर विरोधी पक्षनेत्या सोनिया गांधी आणि तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयीहे आपापल्या निवासस्थानाकडे निघाले होते. तत्कालीन गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी यांच्यासह अनेक खासदार संसदेत उपस्थित होते.

त्यानंतर काही वेळाने जैशचे दहशतवादी एका पांढऱ्या कारमधून संसद भवनाच्या दिशेने आले. या गाडीवर गृह मंत्रालयाचे स्टिकरही लावण्यात आले होते. हे वाहन संसदेच्या मुख्य प्रवेशद्वारावरील बॅरिकेड तोडून सकाळी 11.29 च्या सुमारास संसदेच्या आवारात पोहोचले. कारमधून बाहेर पडताच पाचही दहशतवाद्यांनी एके-47 मधून गोळीबार सुरू केला. त्यावेळी संसदेत उपस्थित खासदार आणि इतर कर्मचाऱ्यांना कोणीतरी फटाके फोडत असल्याचा भास झाला, मात्र लवकरच सर्व वास्तव लक्षात आले. काय घडतंय हे लक्षात येताच सुरक्षा कर्मचाऱ्यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तात्काळ एन्ट्री गेट बंद केले. त्यानंतर दहशतवादी आणि सुरक्षा कर्मचारी यांमध्ये चकमक सुरु झाली.

या चकमकीत सर्व दहशतवादी मारले गेले. संसदेवर हल्ला करण्यासाठी आलेल्या या दहशतवाद्यांचा उद्देश संसदेच्या मुख्य इमारतीत घुसून तेथे उपस्थित खासदारांना लक्ष्य करण्याचा होता, मात्र त्यांना यात यश आले नाही. संसदेबाहेर सुरक्षा दलांनी सर्व दहशतवाद्यांना ठार केले. या हल्ल्यात दिल्ली पोलिसांचे पाच कर्मचारी, सीआरपीएफची एक महिला कॉन्स्टेबल आणि संसदेचे दोन रक्षक शहीद झाले, याशिवाय एकूण 16 जवान जखमी झाले.

दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर 30 किलो आरडीएक्स जप्त करण्यात आले होते. यावरून लक्षात येते की, दहशतवाद्यांनी किती धोकादायक स्फोटांची योजना आखली होती. कुख्यात लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मदच्या पाच दहशतवाद्यांनी कसून नियोजन करून संसद भवनावर हल्ला केला होता. यानंतर लगेचच संसद भवनाची सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्यात आली.

दहशतवाद्यांनी 13 डिसेंबरच का निवडला?

तर, त्यावेळी संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होते. त्यामुळे यावेळी जास्तीत जास्त लोकप्रतिनिधी सभागृहात उपस्थित असणार हे दहशतवाद्यांना ठाऊक होते, म्हणूनच त्यांनी 13 डिसेंबरची तारीख निवडली असावी.

यासोबतच 1989 मध्ये, दहशतवाद्यांनी देशाचे तत्कालीन गृहमंत्री आणि काश्मीरचे ज्येष्ठ नेते मुफ्ती मोहम्मद सईद यांची कन्या रुबिया सईद यांचे अपहरण केले होते. त्याबदल्यात त्यांनी काही साथीदारांना सोडण्याची मागणी भारत सरकारकडे केली होती. 13 डिसेंबरला दहशतवाद्यांची ही मागणी मान्य करत केंद्र सरकारने त्यांच्या पाच साथीदारांची सुटका केली होती. म्हणूनच 13 डिसेंबरचा दिवस दहशतवादी आपला एक विजय दिवस म्हणून समजतात.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif