Hyderabad Man Dies In Russia: भारतीय व्यक्तीचा रशियात मृत्यू, दुतावासाकडून पुष्टी; रशियन सैन्यात भरती झाल्याची चर्चा
मोहम्मद अस्फान (Mohammed Asfan) असे त्याचे नाव आहे. सांगितले जात आहे की, रशिया युक्रेन युद्धात (Russia Ukraine War) त्याचा मृत्यू झाला.
हैदराबाद येथील भारतीय तरुणाचा रशियामध्ये मृत्यू (Hyderabad Man Dies In Russia) झाला आहे. मोहम्मद अस्फान (Mohammed Asfan) असे त्याचे नाव आहे. सांगितले जात आहे की, रशिया युक्रेन युद्धात (Russia Ukraine War) त्याचा मृत्यू झाला. एजंटसोबत तो रशियाला गेला होता. मात्र, एजंटने त्याची फसवणूक केली आणि त्याला व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांच्या सेनेत भरती केल्याचा आरोप आहे. रशियामधील भारतीय दूतावासाने X वर पोस्ट केलेल्या निवेदनात अस्फानच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. मात्र, दुतावासानेही त्याच्या मृत्यूचे स्पष्ट कारण दिले नाही. त्यामुळे या गूढ मृत्यूबाबत अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत.
रशिया युक्रेन संघर्ष अद्यापही कायम
रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्ष अद्यापही कायम आहे. या दोन्ही देशांदरम्यान सुरु असलेल्या युद्धातच अस्फानचा मृत्यू झाला असावा असा दावा केला जात आहे. यादरम्यानच हैदराबाद येथील भारतीय नागरिक मोहम्मद अस्फानच्या मृत्यूची रशियामधील भारतीय दूतावासाने गंभीरपणे घोषणा केली. दूतावासाने अस्फानच्या मृत्यूच्या परिस्थितीबद्दल तपशील सांगण्यापासून स्वत:ला दूर ठेवले असले तरी, त्याचे पार्थीव भारतात आणण्याबाबत दुतावासाने त्याच्या कुटुंबीय आणि नातेवाईकांना आश्वासन दिले आहे. (हेही वाचा, Russian Court Sentences Oleg Orlov: युक्रेनसोबतच्या युद्धावर टीका, मानवाधिकार अधिवक्ता ओलेग ऑर्लोव्ह यांना रशियन कोर्टाकडून तरुंगवासाची शिक्षा)
AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी उठवला आवाज
अस्फानच्या या दुर्दैवी घटनेने भारतीयांच्या दुरवस्थेशी संबंधित एका व्यापक मुद्द्यावर प्रकाश टाकला आहे. ज्यांना आकर्षक नोकरीच्या संधींचे आमिष दाखवून रशियात नेण्यात येते. मोठ्या पगाराच्या नोकऱ्या देण्याच्या बहाण्याने रशियाला नेण्यात आलेल्या सुमारे दोन डझन भारतीयांपैकी अफसानच्या कुटुंबीयांनी सांगितले की, त्यांना AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी त्याच्या मृत्यूची माहिती दिली होती. उल्लेखनीय असे की, ओवेसी हे गेल्या महिन्यात या समस्येवर प्रकाश टाकणारे पहिले नेते होते. एआयएमआयएम नेत्याने ( 21 फेब्रुवारी रोजी म्हटले होते की, त्यांनी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना तेलंगणा, गुजरात, कर्नाटक, जम्मू आणि काश्मीर आणि उत्तर प्रदेश यासारख्या राज्यांतील पुरुषांबद्दल लिहिले होते. ज्यांना अशा प्रकारे फसवणूक झाली आणि त्यांना युद्धात भाग घेण्यास भाग पाडले गेले. (हेही वाचा, Alexei Navalny: अलेक्सी नवलनी यांच्या पत्नीचे X खाते तात्पुरते निलंबित, तक्रारीनंतर पुन्हा सक्रीय)
एक्स पोस्ट
दरम्यान, ओवेसी यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याला परराष्ट्र मंत्रालयाने उत्तर देताना पुष्टी केली की रशियामध्ये अडकलेल्या किमान 20 भारतीयांनी भारतीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला होता. ज्यामुळे त्यांना सुरक्षितपणे मायदेशी परत आणण्यासाठी सरकारी प्रयत्न करता आले. याबाबत एका अवालात म्हटले आहे की, दुबईस्थित एजंट फैसल खानने 'बाबा व्लॉग्स' या यूट्यूब चॅनेलद्वारे पीडितांची फसवणूक केली आणि त्यांना विदेशात नेले. दरम्यान, अशा प्रकारे लोकांची फसवणूक होणे गंभीर मानले जात आहे.