Human Sacrifice: पैसा मिळण्याच्या लालसेने नऊ वर्षांच्या मुलाचा नरबळी; शरीराचे केले अनेक तुकडे, अल्पवयीन मुलासह तिघांना अटक
प्रचंड पैसा मिळवण्यासाठी पुरुषांचा नरबळी देण्याबाबतचे व्हिडिओ त्याने यूट्यूबवर पाहिले होतेयाबाबत शैलेश आणि रमेश यांनी अपहरण झालेल्या मुलाची हत्या करून विधी करण्यासाठी अल्पवयीन मुलाला मदत केली
दादरा आणि नगर हवेली (Dadra and Nagar Haveli या केंद्रशासित प्रदेशातील वलसाडमध्ये अंधश्रद्धेपोटी नऊ वर्षांच्या मुलाचा नरबळी (Human Sacrifice) दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या हत्येमध्ये एका अल्पवयीन मुलाचाही सहभाग आहे. नरबळी देण्यासाठी आधी मुलाचे अपहरण केले गेले व त्यानंतर त्याचे डोके धडापासून वेगळे केले गेले. आर्थिक सुबत्ता यावी म्हणून असे करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. शिरच्छेद केल्यानंतर मृतदेहाचे अनेक तुकडे करण्यात आले होते. नऊ वर्षांच्या मुलाचा विकृत मृतदेह सापडल्यानंतर आठवडाभरानी पोलिसांनी मंगळवारी दोघांना अटक केली.
या प्रकरणात पोलिसांनी 16 वर्षीय मुलालाही ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दादरा नगर हवेलीचे मुख्यालय असलेल्या सिल्वासाजवळील सयाली गावात राहणारा नऊ वर्षीय चैता गणेशभाई कोहला 29 डिसेंबर 2022 रोजी बेपत्ता झाला होता. याबाबत 30 डिसेंबर रोजी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुलाचा शोध घेण्यासाठी पोलिसांची अनेक पथके तैनात करण्यात आली होती.
अखेर वलसाड जिल्ह्यातील वापी तालुक्यातील करवड गावात कालव्याजवळ त्याचा मृतदेह आढळून आला. मात्र मुलाच्या शरीरातून डोके व उजवा पाय गायब असल्याचे दिसून आले. त्यानंतरच्या तपासात सयाली गावातील स्मशानभूमीजवळ 5 जानेवारीला गायब झालेले अवयव सापडले. यानंतर मुलाच्या कुटुंबीयांनी आणि गावकऱ्यांनी मुलाचा नरबळी दिल्याचा आरोप केला.
या घटनेनंतर एका 16 वर्षीय मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. चौकशीमध्ये या नरबळीमध्ये आपला सहभाग असल्याचा खुलासा त्याने केला. या गंभीर प्रकरणात त्याच्या दोन मित्रांचा सहभाग असल्याचेही त्याने सांगितले होते. यानंतर मंगळवारी पोलिसांनी अल्पवयीन मुलीला मदत करणाऱ्या दोन आरोपींना अटक केली. शैलेश कोहकेरा (28) व रमेश संवर (53) अशी या या दोन्ही आरोपींची नावे आहेत. (हेही वाचा: दिल्लीतील 54 वर्षीय हिंदू महिलेची हत्या; मृतदेह स्मशानभूमीत नेऊन पुरला, 3 आरोपींना अटक)
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ताब्यात घेतलेल्या अल्पवयीन मुलाने चैताचे अपहरण केले होते. प्रचंड पैसा मिळवण्यासाठी पुरुषांचा नरबळी देण्याबाबतचे व्हिडिओ त्याने यूट्यूबवर पाहिले होतेयाबाबत शैलेश आणि रमेश यांनी अपहरण झालेल्या मुलाची हत्या करून विधी करण्यासाठी अल्पवयीन मुलाला मदत केली.
दादरा नगर आणि हवेलीचे पोलीस पोलिस अधीक्षक (SP) आरपी मीना यांनी सांगितले की, या प्रकरणी ताब्यात घेतलेल्या 16 वर्षीय मुलाला सुरतमधील बाल रिमांड होममध्ये पाठवण्यात आले आहे. आरोपींनी हत्येसाठी वापरलेली तीक्ष्ण हत्यारे पोलिसांनी जप्त केल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्यावर आयपीसी कलम 302 (हत्या), 201 (गुन्ह्याचा पुरावा नष्ट करणे) आणि 120 (बी) (गुन्हेगारी कट) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.